नागावमधून पळालेला बिबट्या शेजारच्या आक्षी गावात घुसला, दोघांवर हल्ला

नागाव येथून रेक्स्यू पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला बिबट्या आक्षी गावातील साखर परिसरात आल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी (दि.१२) पहाटे बिबट्याने साखर परिसरात दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी बिबट्याने नागाव येथे ६ जणांवर हल्ला केला होता. त्यामुळे आता बिबट्याने हल्ला केलेल्या नागरिकांची संख्या ८ झाली आहे. दरम्यान वन विभागाचं कर्मचारी साखर परिसरात दाखल झाले आहेत.

अलिबाग जवळच्या नागाव मधील वाळंज पाराेडा खालच्या आळीत भर वस्तीत मंगळवारी सकाळी बिबट्याचा वावर आढळून आला. दिवसभरात बिबट्याने सहा जणांवर हल्ला केला. बिबट्याला पकडण्यासाठी अलिबाग वनविभागाचे कर्मचारी यांच्यासह राेहा येथील वनविभागाच्या रेस्क्यू टिम दाखल झाल्या. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच साहित्याचा अभाव यामुळे त्यांच्या मर्यादा उघड झाल्या. परिणामी बिबट्याला पकडण्यासाठी पुणे येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. मात्र त्यांना बिबट्याला पकडण्यात अपयश आले. बुधवारपासून नागाव परिसरात बिबट्याचे अस्तित्व दिसून आले नाही. यामुळे बिबट्या पुन्हा आपल्या नैसर्गिक अधिवासात गेला असावा असा अंदाज बांधून शोध मोहीम थांबविण्यात आली होती. रेस्क्यू पथक परत गेले होते.

मात्र शुक्रवारी नागाव लगत असलेल्या आक्षी गावातील साखर परिसरात बिबट्या आल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी पहाटे बिबट्याने साखर परिसरात दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले आहे. यामेळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.