
शासनाने परराज्यात अडकलेल्या नागरिकांना त्याच्या राज्यात, गावात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार परराज्यातील नागरिक हे आपल्या गावी जायला मिळणार म्हणून आनंदित झाले असून कागदपत्र आणि वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी करू लागले आहेत. जिल्हा सामान्य रुगणालायत वैद्यकीय तपासणी दाखला घेण्यासाठी नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्या असल्या तरी सोशल डिस्टनसिंगचा यामुळे फज्जा उडाला आहे. रुग्णालय तसेच पोलीस सोशल डिस्टनसिंग नियम पाळण्याच्या सूचना देत असूनही नागरिक नियम डावलताना दिसत आहेत.
काहीही करून आपल्या राज्यात, आपल्या गावी जायचंच असा चंग जिल्ह्यात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी बांधला आहे आणि त्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. सकाळपासूनच कागदपत्र जमवणे, नोंदणी करणे त्याचबरोबर वैद्यकीय चाचणी करून घेणे यासाठी झेरॉक्सचं दुकान, सायबर कॅफे असेल किंवा सरकारी रूग्णालये असतील याठिकाणी भल्यामोठया रांगा लावल्या जात आहेत. हे करत असताना कुठेही सोशल डिस्टन्सींगचं पालन होताना दिसत नाही. त्यामुळे अधूनमधून पोलीसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. आज सकाळपासूनच अलिबागच्या जिल्हा रूग्णालयासमोर 3 हजार मजूर रांगेत उभे होते. परराज्यातील नागरिक याना प्रशासनामार्फत त्याच्या गावी सोडण्यासाठी हालचाली सुरू असताना या नागरिकांच्या अति उत्साहीपणाचा ताप हा पोलीस तसेच रुग्णालय प्रशासनाला सहन करावा लागत आहे.































































