विदर्भ खासदार महोत्सवात रायगडच्या सायकलपटूंची जिंकूनही हार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अलिबाग

नागपूर येथे घेण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात दुसऱ्या पर्वात झालेल्या सायकलिंग स्पर्धेत रायगडचे निकेत पाटील यांनी पुरुष गटात, तर चैताली शिलदणकर यांनी महिलांच्या गटात अव्वल नंबर मिळवूनही ही स्पर्धा विदर्भ मधील स्पर्धकांची असल्याचे सांगून त्यांना पुरस्कार नाकारण्यात आला. संयोजकाच्या या आडमुठे धोरणामुळे निकेत व चैताली यांना स्पर्धेला जाऊन अव्वल नंबर मिळवूनही पुरस्काराविना परतावे लागले आहे. आयोजकांच्या आडमुठे पणामुळे जिल्ह्यातील या दोन स्पर्धकांना वेळ, पैसा, प्रवास व मनस्ताप सहन करावा लागला आहे.

नागपूर येथील खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत सायकलिंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रायगडतील अलिबाग येथून निकेत पाटील व चैताली शिलदणकर हे दोन सायकलपटू गेले होते. स्पर्धेला जाण्यापूर्वी दोघा स्पर्धकांनी नागपूर येथे अयोजकांशी संपर्क साधला होता. त्यावेळी नोंदणी करणाऱ्या व्यक्तीने तुम्ही स्पर्धेत सहभाग घ्या, मात्र कुठून आलात हे सांगू नका असे सांगितले. त्यानुसार निकेत व चैताली हे दोघे स्पर्धेसाठी अलिबागहून नागपूरला रवाना झाले.

स्पर्धेला गेल्यानंतर 21 किलोमीटरच्या स्पर्धेत निकेत यांनी, तर चैताली यांनी महिलांच्या 11 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. त्यावेळी त्याच्या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पसरला होता. मात्र हा आनंद क्षणिकच ठरला. कारण आयोजकांनी ही स्पर्धा फक्त विदर्भ मधील स्पर्धकांसाठी असल्याचे त्यांना सांगून पुरस्कार नाकारला. मात्र या स्पर्धेत असा कुठेही उल्लेख नसल्याचे निकेत यांनी सांगितले. याबाबत निकेत व चैताली यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ही बाब स्पर्धेचे संयोजक संदीप जोशी यांच्या निर्दशनात आल्यानंतर त्यांनी या प्रकाराबाबत माफी मागितली असून निकेत व चैताली यांना जाण्या येण्याचा खर्च देण्याची तयारी दर्शवली असे निकेत पाटील याने सांगितले. मात्र या घटनेने निकेत व चैताली यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला असून याबाबत संयोजकांनी आधीच सांगितले असते तर दोघांनाही मनस्ताप झाला नसता.