
फोर्थ सॅटर्डे, सण्डे आणि एक-दोन दिवसांची नाताळची रजा टाकून अनेकांची पावले कुटुंबकबिल्यासह रायगडातील समुद्र किनाऱयांकडे वळली आहेत. थर्टीफर्स्टचे फेसाळते स्वागत करण्यासाठी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, काशीद तसेच दिवेआगारच्या समुद्रकिनाऱयांवर पर्यटकांचे अक्षरशः तुफान आले आहे. सर्वत्र थर्टीफर्स्टचाच मूड असून डान्स, म्युझिक, बोटिंग, पॅराग्लायडिंग, वॉटर गेम्स अशी फुल्ल धम्माल मस्ती सुरू झाली आहे.
2019 सालातील कडू-गोड आठवणींना बाय बाय म्हणत 20-20 म्हणजे 2020 चे जल्लोषात स्वागत करण्यासाठी बच्चे कंपनीपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वचजण सज्ज झाले आहेत. मुंबई व ठाणेकरांनी त्यातल्या त्यात आवडते डेस्टिनेशन म्हणून रायगड जिह्यातील समुद्रकिनाऱयांनाच जास्त पसंती दिली आहे. शाळा, कॉलेजेसना नाताळची सुट्टी लागल्याने तरुणाई बेहद्द खूष असून तीन-चार दिवस ‘दिल-दोस्ती आणि दुनियादारी’ करण्यासाठी सर्वजण घराबाहेर पडले आहेत.
अलिबागसह मुरूड, श्रीवर्धन व काशीद येथील समुद्रकिनाऱयांवर पर्यटकांना कसलीही कमतरता भासू नये म्हणून स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. बोटींग, लाईफगार्ड, गाईड, फोटोग्राफर, खवय्यांसाठी स्टॉल्स आदी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
– मुरूड-जंजिरा नगर परिषदेने 29 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान समुद्रकिनाऱयावर पर्यटक महोत्सकाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात संगीत, नृत्य, कव्वाली आदी कार्यक्रम होणार असून मॅरेथॉन स्पर्धादेखील होईल. मुरूड-जंजिरा नगर परिषद कार्यालयापासून पर्यटन दिंडी निघणार आहे. त्यानंतर शिवसेना सचिव आणि होम मिनिस्टचे फेम आदेश बांदेकर यांचा ‘खेळ मांडियेला’ हा कार्यक्रम होईल. स्करसंध्या, लोकधारा, देशभक्तीपर समूहनृत्य आदी भरगच्च कार्यक्रम होणार असल्याचे नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सांगितले.
शाकाहारी-मांसाहारी थाळी महागली
थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या समुद्रकिनाऱयांवर पर्यटकांची उडालेली झुंबड लक्षात घेऊन हॉटेल्सवाल्यांनी जेवणाचे दरही वाढवले आहेत. 500 रुपयांची मच्छीची थाळी 600 ते 650 करण्यात आली असून चिकन-मटण थाळीचा दर 400 वरून 500 वर आला आहे. व्हेज थाळीने 250 वरून थेट 300 रुपयांवर उडी मारली आहे. मात्र हौसेला मोल नसल्याने पर्यटक हॅप्पी नाताळ आणि हॅप्पी न्यू इअर म्हणत ही महागाई देखील एन्जॉय करीत आहेत.
























































