उमटे धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प असूनही नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

तालुक्यातील उमटे धरणातील येणाऱ्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. मातीमिश्रित पाणी पियाल्याने नागरिक आजारी पडत आहेत. उमटे धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू झाला असूनही नागरिकांना मातीमिश्रित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे शुद्ध पाणी देण्याची मागणी नागरिकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासन नागरिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

अलिबाग तालुक्यातील उमटे धरण 1984 साली बांधले आहे. या उमटे धरणातून 62 गावांतील लाखो नागरिक पाणी पीत आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्प याठिकाणी नसल्याने 35 वर्ष येथील नागरिक अशुद्ध पाणी पीत आहेत. उमटे धरणावर दीड कोटी खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र प्रकल्प पूर्ण झालेला असूनही नागरिकांना अशुद्ध पाणीच नळावाटे येत आहे.

उमटे धरणातून येणारे पाणी हे मातीमिश्रित असल्याने पाणी भरण्याची भांडी पाण्याने भरल्यानंतर भांड्याच्या तळाशी मातीचा थर साचलेला दिसतो. त्यामुळे असेच मातीमिश्रित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागत आहे. अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने घरातील माणसे आजारी पडत असल्याचे चंद्रभागा झावरे, दत्तात्रय झावरे यांनी सांगितले. माती मिश्रित पाणी येत असल्याने काही नागरिक विकतचे पाणी आणून पीत आहेत. मात्र विकतचे पाणी आणणे रोजचे परवडत नसल्याने नाईलाजस्तव नागरिक माती मिश्रित पाणी पीत आहेत.

उमटे धरणातील गाळही बांधल्यापासून काढला नसल्याने गेली 35 वर्ष नागरिक अशुद्ध पाणी पीत आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू होऊन सुध्दाही नागरिक अशुद्ध माती मिश्रित पाणी पीत आहेत. मात्र जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. नागरिक शुद्ध पाणी देण्याबाबत प्रशासनाकडे मागणी करीत आहेत.