‘सीएए’विरोधी आंदोलन चिघळले; अलिगढ, जाफराबादमध्ये दगडफेक

313

‘सीएए’विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये हिंसक वळण लागले. अलिगढमध्ये ऊपरकोट, शाहजमाल आणि दिल्ली गेट परिसरात तणाव निर्माण झाला. सर्वप्रथम दिल्ली गेट परिसरात आंदोलकांच्या गर्दीत शिरलेल्या काही समाजकंटकांनी धार्मिक स्थळाजवळ दगडफेक केली. दुसरीकडे दिल्लीत जाफराबादजवळील मौजपूरमध्ये ‘सीएए’समर्थक आणि विरोधकांत तुफान दगडफेक झाली. यात अनेकजण जखमी झाले.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थिनींनी ऊपरकोट परिसरात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. यात सातजण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. येथूनच आंदोलन चिघळण्यास सुरुवात झाली. आंदोलकांनी जामा मशिदीजवळील ट्रान्सफॉर्मर जाळण्याचाही प्रयत्न केला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच हवेत अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. तसेच दिल्ली गेट, शाहजमाल आणि ऊपरकोट परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. भडकावू मेसेज व्हायरल होऊ नयेत म्हणून इंटरनेटही बंद केले. पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱयांनी संतप्त जमावाला शांत केले. परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दिल्लीत समर्थक-विरोधक भिडले
दिल्लीच्या जाफराबादमध्ये मौजपूरजवळ भाजप नेते कपिल मिश्रा व त्यांचे कार्यकर्ते ‘सीएए’समर्थनार्थ हनुमान चालिसाचे पठण करत होते. याचवेळी ‘सीएए’समर्थक आणि विरोधकांत दगडफेक सुरू झाली. शनिवारी रात्री उशिरा शाहीन बागेप्रमाणेच जाफराबाद मेट्रो स्टेशनवर महिलांनी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर रविवारी दुपारी चांदबागमध्येही आंदोलन करण्यात आले.

आंदोलनामुळे मेट्रो, रस्ते बंद
महिलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जाफराबाद स्टेशनवर मेट्रोचा थांबा तूर्तास रद्द केला आहे. या स्टेशनवर येण्या-जाण्याचे सर्व गेट बंद केले आहेत. तसेच सलीमपूरहून यमुना विहार आणि मौजपूरला जोडणारे रस्तेसुद्धा बंद करण्यात आले आहेत.

आंदोलनाविरोधात स्थानिक लोक रस्त्यावर
‘सीएए’विरोधी आंदोलनामुळे शाहीन बाग, जाफराबाद मेट्रो स्टेशन आणि चांदबाग परिसरातील सर्व रस्ते बंद आहेत. हे रस्ते खुले करण्याची मागणी करीत स्थानिक लोक रस्त्यावर उतरले. आंदोलनामुळे आमचे जनजीवन विस्कळीत झाले. मुलांना शाळेत जाता येत नाही. नोकरदारांच्या दांडय़ा होताहेत असे म्हणणे मांडत महिलांनी परिसरातील रस्ते खुले न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या