
गायत्री गोपीचंद व त्रेसा जॉली या 16व्या मानांकित हिंदुस्थानी जोडीने ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. युकी फुकुशिमा व सयाका हिरोटा या माजी अव्वल मानांकित जपानी जोडीचा पराभव करीत सलग दुसऱ्या वर्षी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. गायत्री-जॉली जोडीने माजी विजेत्या युकी-सयाका जोडीचा 21-14, 24-22 असा पराभव केला. 50 मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत हिंदुस्थानी जोडीने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजविले. गतवर्षी या हिंदुस्थानी जोडीने ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. आता बलाढय़ जपानी जोडीचा पराभव केक्षाने गायत्री-जॉली जोडीचे मनोबल उंचावले आहे.

























































