2021 मध्ये यूजीसी, एआयसीटीई विलीन करणार; देशात एकच शिक्षण आयोग होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2021 हे वर्ष देशातील शैक्षणिक सुधारणांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकच उच्च शिक्षण आयोग स्थापन केला जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) त्या आयोगामध्ये विलीन केली जाणार आहे.

केंद्रीय उच्च शिक्षण सचिव अमित खरे यांनी फिक्कीच्या वार्षिक संमेलनात आज ही माहिती दिली. देशातील उच्च शिक्षण संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या यूजीसी आहे. तंत्रशिक्षण संस्थांसाठी एआयसीटीई आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी एनसीटीई आहे. या सर्वांचे एकाच आयोगामध्ये विलीनीकरण होईल. पुढील वर्षीपासून देशातील उच्च शिक्षण संस्थांवर एकाच आयोगाचे नियंत्रण राहील असे त्यांनी सांगितले. याशिवाय सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा घेतली जाईल अशीही माहिती त्यांनी दिली.

देशात सध्या उच्च शिक्षण क्षेत्रात एक हजारांपेक्षा जास्त विद्यापीठे आणि पाच हजारांवर महाविद्यालये व संस्था आहेत. त्यातील शिक्षण मात्र आजही सुमार दर्जाचे समजले जाते. एकाच आयोगाच्या नियंत्रणाखाली या सर्व संस्था आल्या तर शिक्षणाचा दर्जा सुधारणे अधिक सोपे जाणार आहे. नव्या बदलांमध्ये खासगी क्षेत्रातील शिक्षण संस्थांचाही विचार केला जाणार असल्याचे खरे यांनी सांगितले.