
मराठी ही भक्तीची आणि शक्तीची भाषा आहे. राज्यातील प्रत्येकाला ही भाषा आलीच पाहिजे. मायबोली मराठीचा सन्मान कदापि कमी होऊ देणार नाही. शालेय शिक्षणातील मूल्य शिक्षणात संत वाङ्मयाचा समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करणारच आहे. शिवाय संत वाङ्मयाच्या साहाय्याने शिक्षणाचा पाया अधिक मजबूत करू, अशी ग्वाही शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
वारकरी साहित्य परिषदेच्या आठव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, वीणा पूजन आणि साहित्य पूजनाने करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. अमृत महाराज जोशी, श्रीमद् शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी पाटील, महापौर सूरमंजिरी लाटकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. हभप निवृत्ती महाराज नामदास, हभप प्रभाकर महाराज बोधले, हभप भानुदास महाराज आणि हभप उषाताई कांबळे यांना विशेष विठ्ठल पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेलच!
मराठी ही भक्तीची आणि शक्तीची भाषा आहे. राज्यातील प्रत्येकाला ही भाषा आलीच पाहिजे. मराठीचा सन्मान कदापि कमी होऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तत्काळ मिळावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे ती निश्चितच मान्य होईल. संतांच्या वाङ्मयाचा आपल्या शिक्षणाला स्पर्श व्हावा यासाठी त्याचा समावेश शालेय शिक्षणातील मूल्य शिक्षणात झाला पाहिजे, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.



























































