मराठी माध्यमाच्या सर्व प्रश्नपत्रिका शुद्ध मराठीत छापणार, युवासेनेच्या दणक्यानंतर मुंबई विद्यापीठाचे परिपत्रक

मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष मराठी विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अनेक प्रश्न इंग्रजी भाषेत दिल्याचे समोर आल्यानंतर युवासेनेने कुलसचिवांची भेट घेऊन मराठीची गळचेपी सहन करणार नाही, असे ठणकावले होते. युवासेनेच्या दणक्यानंतर कुलसचिवांनी मराठी माध्यमाच्या सर्व प्रश्नपत्रिका शुद्ध मराठीतच काढण्यात याव्यात असे परिपत्रक काढण्याचे त्वरित आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी युवासेनेचे आभार मानले आहेत.

द्वितीय वर्ष मराठी विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अनेक प्रश्न इंग्रजीत असल्याच्या तक्रारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत युवासेना सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरुखकर, प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी विद्यापीठाचे कुलसचिव प्रसाद कारंडे यांची भेट घेतली होती. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी केली होती.

परिपत्रकात काय?

यापुढे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱया परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे मराठीत भाषांतर करून त्या हस्तलिखित कक्षात जमा करण्यापूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हस्तलिखिते कक्षामध्ये जमा कराव्यात, असे परिपत्रकात नमूद आहे. तसेच इंग्रजी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे मराठीत भाषांतर करताना नेमणूक करण्यात आलेले संबंधित विषयाचे अध्यक्ष, अनुवादक, परीक्षक यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे.