
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले असून संसदीय परंपरा जपणारा नेता हरपला अशी हळहळ व्यक्त होत आहे.
12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्हय़ातील चाकूर येथे शिवराज पाटील यांचा जन्म झाला. 1960 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. लातूरचे नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले. अगोदर विधानसभा आणि त्यानंतर 1980 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. सलग सात वेळा त्यांनी लोकसभेत लातूरचे प्रतिनिधीत्व केले. इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा त्यांना संरक्षण राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. वाणिज्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश, महासागर विकास या खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणारे नेतृत्व
शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक कारकीर्दीत समाजाच्या कल्याणासाठी मोठे काम केले. गेल्या काही वर्षांत त्यांच्यासोबत माझे अनेक केळा संवाद झाले, त्यापैकी सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
जनतेच्या समस्या सोडवण्याचा ध्यास
काँग्रेसची विचारसरणी आणि जनतेच्या समस्या सोडवण्याचा ध्यास यांचा प्रभावी संगम साधत शिवराज पाटील चाकूरकर यांनी राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात मोलाची भूमिका बजावली. विविध राजकीय पदांवर कार्यरत असताना त्यांनी केलेले कार्य हे जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे ठरले. – शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
राजकारणातील सुसंस्कृत पर्व संपले
राजकारणातील शालीनता, सुसंस्कृततेचा लौकिक सातासमुद्रापार नेणारे पर्व आज संपले. लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास कायम स्मरणात राहील. चाकूरकरांचा संविधानाचाही गाढा अभ्यास होता. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द अभ्यासपूर्ण ठरली. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री































































