अल्टो पलटली; दोन जण ठार, दोन जखमी

सामना प्रतिनिधी । बीड

बीड-नगर या मार्गावर गुरूवारी दुपारी अल्टो गाडी पलटल्याने झालेल्या अपघातात नांदेडचे दोघे जण ठार झाले असून दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

बीडपासून 40 कि.मी.अंतरावर असणाऱ्या अंमळनेर येथे बीड-नगर या मार्गावर दुपारी दोन वाजता अल्टो एम.एच.26 ए.के.3676 पलटी झाली. नागमोडी आकाराच्या या रस्त्यामुळे गाडी नियंत्रणाच्या बाहेर जावून अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अल्टो गाडीने तीन-चार पलट्या घेतल्यामुळे गाडीतील प्रवाशांना मार लागला. या अपघातात नांदेड येथील पांडुरंग दासराव पांडे (57), उदया पांडुरंग पांडे (50) या दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले. जखमींना बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.