खमंग अळूवडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

श्रावण महिन्याचं नातं हिरव्यागार निसर्गाशी, लपाछपी खेळणाऱया पावसाशी तसंच रुचकर श्रावणी पदार्थांशीही… या पदार्थांमधला खमंग कुरकुरीत आस्वाद म्हणजे अळूवडी…याच अळूवडीची ही वळणदार गोष्ट.

पावसाळा सुरू झाला की, अळूची पानं मुबलक प्रमाणात दिसू लागतात. बाजार ही संकल्पना फारशी प्रभावी नसण्याच्या काळात दारोदारी उगवणाऱया भाज्याच आहाराचा भाग होत असत. अळूला पाणी जास्त लागते. भरपूर पाणी पिऊन पावसाळय़ात दारोदारी उगवणाऱया अळूला आहारात स्थान न मिळते तर नवलच! अळूची भाजी होते. अळूच्या पानांपासून वडय़ा बनतात. अळूच्या देठांपासून देठी बनवली जाते. अळूचा कंद ज्याला आरवी म्हटले जाते तो उपवासासाठी उकडून खाल्ला जातो.

अळूच्या पाने विविध प्रांतात वेगवेगळय़ा नावांनी ओळखली जातात. मराठवाडय़ात अळूला ‘चमकोरा’, ‘चमकुरा’ असेही म्हटले जाते. अन्य काही देशांत ‘अळू टारो’, ‘एलिफंट इयर्स’ (हत्तीचे कान) म्हणून ओळखले जाते. हिंदीत ‘काचालू’, गुजरातीत ‘अळवी’, कानडीत ‘श्यामी’ अशा नावांनी अळू प्रसिद्ध आहे.

अशी महती सांगणाऱया अळूचं सगळय़ात लोकप्रिय रूप म्हणजे अळूवडी. ‘पात्रा’, ‘पात्रोडू’, ‘पात्रोडे’ अशा नावांनी प्रसिद्ध अळूवडी देशातील विविध प्रांतात आणि देशाबाहेरही चवीने खाल्ली जाते. केरळात ती ‘चेंबिलिया अप्पम’ होते, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ‘अरबीके पत्तोंके रिकवच’, फिजी देशात ‘सैना’, त्रिनिदादमध्ये ‘साहिना’ म्हणून ती खाल्ली जाते.

असे हे अळू 2021 मध्ये आयुष मंत्रालयामुळे पुन्हा चर्चेत आले. लोहाने परिपूर्ण अळूची पाने हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत, तसेच मोठय़ा प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व, कॅल्शियम, फॉस्फरस देऊ करतात. याच कारणाने त्याचा आहारात समावेश करावा असे आयुष मंत्रालयाने जाहीर केले.

अर्थात हे जरी सरकारी पातळीवर सांगितले गेले नसते तरी अळू आपल्याकडे घरात स्थिरस्थावर झालेली भाजी आहे. विशेष म्हणजे परसदारी मिळणाऱया भाज्यांचं अप्रूप कमी होतं, पण तसं अळवाचं नाही. अळूचं फदफदं असं विचित्र नाव धारण करणारी अळूची भाजी असो किंवा काही वेळा घसा खवखवायला लावणारी अळूवडी, हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात.

ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. पाचूच्या हिरव्या रानी हळदीचे ऊन आलेले असते. अशा विलक्षण वातावरणात कुरकुरीत, खमंग अळूवडी बहार आणते. कित्येक घरांमध्ये श्रावणी सोमवार, शनिवारचा उपवास सोडताना बनवल्या जाणाऱया पारंपरिक पदार्थांत अळूवडीचं स्थान खास असतं. अळूवडीचा प्रत्येक तुकडा मुखात शिरताना हीच भावना निर्माण करतो, ‘श्रावणमासी हर्ष मानसी…’

कोकणात बनते अळूवडीची भाजी
बनवण्याच्या पद्धतीत, वापरल्या जाणाऱया घटकांमध्ये बदल होत गेला तरी अळूवडीचे रूप सगळीकडे समान आढळते. कोकणात काही भागांत अळूवडीची भाजी बनवली जाते. अळूवडीचे उंडे गार झाले की, त्याच्या चौकोनी फोडी करून तीळ आणि थोडे जास्त तेल घातलेल्या फोडणीत या फोडी हलक्या हाताने परतल्या जातात. वरून भरपूर ओलं खोबरं घातलं की भाजी तयार.