भाजपच्या रसदीवर अमरसिंहांचा लवकरच नवा राजकीय पक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

पुढील वर्षी होणाऱया लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या एकत्रित व्होट बँकेच्या ठिकऱया उडवण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. त्यानुसार अमरसिंह हे ‘सपा’मधील एका बडय़ा नाराज नेत्याला हाताशी धरून भाजपच्या रसदीवर लवकरच नवा पक्ष स्थापन करणार आहेत.

अमरसिंह यांच्या नव्या पक्षाचे नाव आणि कार्यकारिणी निश्चित झाली असून येत्या स्वातंत्र्यदिनानंतर पक्षाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. अमरसिंह यांना ‘सपा’चे संस्थापक मुलायमसिंग यादव यांनी दीर्घ काळानंतर पक्षात पुन्हा प्रवेश दिला होता. पण ‘सपा’ची सारी सूत्रे हाती एकवटलेले माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काही अमरसिंह यांना पक्षात थारा दिलेला नाही. त्यामुळे अखिलेश यांच्यावर अमरसिंह कमालीचे चिडलेले असून ‘सपा’ला धडा शिकवण्याचा चंगच त्यांनी आता बांधला आहे. गेल्याच आठवडय़ात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावर स्थान पटकावले होते.

ठाकूर-यादव मतांच्या ठिकऱया उडवण्याचे लक्ष्य

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या २५ जागांवर यादव आणि ठाकूर या दोन समाजांचा प्रभाव आहे. उत्तर प्रदेशात ९ टक्के लोकसंख्या असलेला यादव समाज १० जागांवर निर्णायक आहे, तर ७ टक्के लोकसंख्या असलेला ठाकूर समाज १५ जागांवर निर्णायक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी आणि बसपा यांची युती निश्चित झाली आहे. त्यामुळे भाजप आणि अमरसिंह यांनी यादव आणि ठाकूर या दोन समाजांच्या व्होट बँकेच्या ठिकऱया उडवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.