
नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी अमरावतीला जात असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले नगरचे कापड व्यापारी सुभाष सिमरतमल चंगेडिया (वय 65) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
सुभाष चंगेडिया आणि त्यांचे नातेवाईक व्याह्याच्या अंत्यसंस्कारासाठी अमरावती येथे जात होते. 31 ऑक्टोबर रोजी पहाटे त्यांच्या तवेरा गाडीचा अपघात झाला. अमरावती शहराजवळ रस्त्याच्या बाजूने लोखंडी सळ्या भरलेला ट्रक होता. या ट्रकचे कोणतेही सिग्नल लाईट लावलेले नव्हते. त्याचबरोबर सळ्यांना पाठीमागून लाल कापड अथवा सिग्नल मिळेल, असे काहीही लावलेले नव्हते. त्यामुळे तवेरा गाडीच्या चालकाला ट्रकजवळ गेल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्यावेळी तवेरा चालकाने सळ्यांचा ट्रक हुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तवेरा गाडी क्लीनरच्या बाजूने या ट्रकवर आदळली. त्यात सुभाष चंगेडिया आणि त्यांच्या पाठीमागे बसलेले नगरचे शेअर मार्केट व्यावसायिक योगेश मुथा गंभीर जखमी झाले. लोखंडी सळ्या चंगेडिया यांना लागून त्यांचा मोठा प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर जखमींना तातडीने अमरावतीच्या रेडियन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना चंगेडिया यांचे निधन झाले. योगेश मुथा यांच्यावर उपचार सुरू आहेत.




























































