
अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही. मात्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झाला आहे का याची पाहणी करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिह्यांमध्ये मागील आठवडय़ापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. पुण्यातील 12 नमुनेदेखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यातही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत.

























































