भरपाईसाठी पाच हजार रुपये तातडीची मदत

541

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिली.

रावते यांनी आज अकोला, अमरावती जिह्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. बैठकीला आमदार श्रीकांत देशपांडे, गोपिकिशन बाजोरिया, डॉ. संजय रायमूलकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, मदत व पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, कृषी सहसंचालक सुभाष नागरे आदी उपस्थित होते.

शेतपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या परिस्थितीत शासन शेतकऱयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी यासाठी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विदर्भातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर या खरीप पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पीक विम्यासोबतच पीक विमा काढलेला नसलेल्या शेतकऱ्यांनाही पीक विम्याप्रमाणेच नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही रावते यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या