
अमरावतीतील मेळघाट येथे मजूरांना घेऊन जाणारी पिकअप दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 मजूर ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमरावती जिल्ह्यातील धरणी ताल्युक्यातील 20 मजूर पिकअप व्हॅनमधून कंजूली गावी जात होते. त्यावेळी राणी गावाजवळील घाटात चालकाचा पिकअपवरील ताबा सुटला व पिकअप 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. रात्री हा अपघात झाल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. आजुबाजुच्या गावातील लोकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मजूरांना रुग्णालयात दाखल केले.
10 जण गंभीर जखमी
या अपघातात 15 जण जखमी झाले असून त्यातील 10 ते 12 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा अपघात इतका भीषण होता की काही मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


























































