अमरनाथ ढगफुटी; 40 जण बेपत्ता, 16 भाविकांचा मृत्यू, पुण्यातील दोघे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण ढगफुटीमुळे मृत पावलेल्यांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. त्यात पुण्यातील दोघांचा समावेश आहे. पिंपरीमधील प्रदीप नाथा खराडे आणि वडगाव बुद्रुक येथील सुनीता महेश भोसले अशी दोघांची नावे आहेत.

पुण्यातून 255 जणांचा ग्रुप 2 संस्थांच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेकरिता गेला होता. गुरुकृपा ट्रव्हलमार्फत प्रदीप खराडे यात्रेस गेले होते. दर्शनानंतर बेस कॅम्पवर आल्यानंतर पहाटे 4 वाजता हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबतचे इतर यात्रेकरू बलताल बेस कॅम्पमध्ये सुखरूप असून रविवारनंतर ते परतीचा प्रवास करतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तर सुनीता भोसले या देहूफाटा येथील एका ट्रॅव्हल कंपनीमधून पती आणि नणंद यांच्यासोबत यात्रेकरिता गेल्या होत्या. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने जम्मूपर्यंत आणण्यात आले.

या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत सुमारे 40 जण बेपत्ता झाले असून हिंदुस्थानी लष्कर, एनडीआरएफ, आयटीबीपी, जम्मू-कश्मीर पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. 35 जखमींना एअरलिफ्ट केले आहे. पुराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या सैनिक आणि नागरिकांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून विशेष वॉल पेनिट्रेशन रडारचा वापर केला जात आहे. प्रशासनाने शुक्रवारी रात्री यात्रा स्थगित केली असून पहलगाम आणि बालटाल येथील बेस कॅम्पच्या पलीकडे कोणत्याही प्रवाशाला जाण्याची परवानगी नाही.

ही ढगफुटी नव्हे

हवामान केंद्रावर एका तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्यास त्याला ढगफुटी म्हणतात. अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत 31 मिमी पाऊस पडला. त्यामुळे हा विध्वंस ढगफुटीमुळे नाही तर स्थानिक पातळीवरील मुसळधार पावसामुळे झाल्याचे हिंदुस्थानी हवामान विभागाने स्पष्ट केले. अमरनाथ गुहा मंदिराजवळील डोंगरांच्या उंच शिखरांवर पावसामुळे अचानक पूर आला असावा, असे हिंदुस्थानी हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.