
आजच्या घडीला हिंदुस्थानातील दूरसंचार बाजारपेठ जगातील मोठ्या टेक कंपन्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने यापूर्वी सॅटेलाइट इंटरनेट प्रकल्प ‘स्टारलिंक’द्वारे हिंदुस्थानात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आता अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस त्यांच्या ‘कुइपर’ प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थानात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. अॅमेझॉनने दूरसंचार विभागाशी संपर्क साधला आहे. विशेष म्हणजे कुइपरचा अर्ज स्टारलिंकच्या आधीचा आहे. मात्र अद्याप तो मंजूर झालेला नाही.
कुइपरअंतर्गत अॅमेझॉन देशातील प्रमुख शहरे मुंबई आणि चेन्नई येथे दहा ग्राऊंड स्टेशन व दोन मोठे हब बांधण्याची योजना आखत आहे. जिथे इंटरनेटची उपलब्धता खूपच कमी आहे किंवा अजिबात उपलब्ध नाही अशा भागांत या सॅटेलाइट इंटरनेट सेवेचा मोठा भर आहे. एकूणच दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करणे हा मुख्य उद्देश आहे. कुइपर प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आला. अॅमेझॉनला यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनकडून मान्यता मिळाली आहे.
सॅटेलाइट इंटरनेट ही एक सेवा आहे, ज्यामध्ये लोकांना सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सुविधा दिली जाते. जिथे नेटवर्क सेवा उपलब्ध नाही अशा भागातही यामुळे इंटरनेट उपलब्ध होते. त्यामुळे डोंगराळ भाग आणि दुर्गम भागातील गावातील लोकांना इंटरनेट सेवेचा लाभ घेता येईल. स्टारलिंक आणि कुइपर या दोन्ही कंपन्यांमधील स्पर्धेमुळे ग्राहकांना स्वस्त योजनांचा लाभ मिळू शकतो.
स्टारलिंकशी स्पर्धा
प्रोजेक्ट कुइपर थेट स्टारलिंकशी स्पर्धा करेल हे स्पष्ट आहे. दोन्ही प्रकल्पांचे लक्ष्य कमी कक्षेच्या उपग्रहांद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट प्रदान करणे आहे. दरम्यान, हिंदुस्थानचे दूरसंचार क्षेत्र आता फक्त मोबाईल कंपन्यांपुरते मर्यादित राहिलेले नाही. सॅटेलाइट इंटरनेटच्या आगमनाने जागतिक स्पर्धकांचे आगमन होत आहे. येत्या काळात प्रचंड स्पर्धा असेल यात शंका नाही.