ठाण्याच्या रुग्णालयावर परिवहन विभागाची गुरु‘कृपा’, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारकडून कारवाईचा इशारा 

धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एसटी कर्मचाऱ्यांना ठाण्याच्या गुरुकृपा रुग्णालयाचे आरोग्य तपासणी सर्टिफिकेट घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र असेल तर तीन हजार दिले जातील, मात्र यामुळे गाव-खेड्यातून कर्मचाऱ्यांना पदरमोड करून ठाणे शहरात यावे लागत आहे. ठाण्यातीलच या रुग्णालयावर सरकारची ‘कृपा’ कशासाठी, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत ही सक्ती रद्द करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

…तर दोषींवर कठोर कारवाई करू!

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच डॉक्टरच्या सर्टिफिकेटसाठी दबाव टाकू नये. असे प्रकार होत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. कोणीही एकाधिकारशाहीने असा निर्णय घेत असेल तर तरीही असा प्रकार घडला असेल तर चौकशी करून जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असे आश्वासन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिषदेत दिले.

एकाच डॉक्टरकडून प्रमाणपत्र का घेतले जातेय?

कायद्यात बदल करून परिवहन महामंडळ किरण पंडित नावाच्या डॉक्टरपुढे पायघड्या का घालत आहे? या एकाच डॉक्टरचे प्रमाणपत्र आणण्यासाठी कर्मचाऱ्यांवर सक्ती का केली जात आहे, असा सवाल अनिल परब यांनी विचारला. दरम्यान, परिवहन विभागाची 10 हजार कोटींची बिले प्रलंबित असताना ठाण्यातील किरण पंडित या डॉक्टरच्या सर्टिफिकेटची सक्ती कशासाठी सुरू आहे? नांदेड, सांगली, रत्नागिरी या भागात विशेष युनिट स्थापन करण्यात आली आहेत. मग एकावर सरकारची कृपा कशासाठी, असा सवाल दानवे यांनी विचारला. या विषयावर भाई जगताप, प्रवीण दरेकर यांनीदेखील प्रश्न विचारले.