
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी एक ‘व्हिडिओ बॉम्ब’ फोडला आहे. शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांच्या गड्ड्यांसह व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. अशातच अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी या सरकारकडे पैसे नाहीत, कॉन्ट्रॅक्टरचे बील द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत आणि एवढे ढीगच्या ढीग पैसे सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे आहेत. महाराष्ट्रात कशाप्रकारे राजकारण सुरू आहे, कशापद्धतीने खोक्यांचे राजकारण सुरू आहे, सत्ताधारी पक्षाचा कसा उन्माद सुरू आहे, हे तो या व्हिडीओच्या माध्यमातून मी जनतेसमोर आणलेला आहे, असे दानवे म्हणाले.
पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, एकतर माझ्याकडे या लोकांशी संबंधित व्यक्तिनेच हा व्हिडीओ पाठवला आहे. मला तर माहितही नव्हते आमदार कोण आहेत यात? आता तुम्ही नाव सांगितले त्यांच्यासारखा दिसतो हा. मी तर म्हणेन त्या व्यक्तीसमोर कोण व्यक्ती आहे तेही तपासले पाहिजे. एवढ्या नोटा, एवढ्या नोटांचे बंडलं. अक्षरशः रास आहे. धान्याच्या राशीप्रमाणे नोटांची रास आहे. इथे सामन्य माणसाने 50 हजार जरी बॅंकेत भरले तर त्यांना पाच मिनिटांत नोटीस येते. फार वेळ लागत नाही नोटीस यायला. एवढ्या नोटांचा ढीग संदर्भात हे महोदय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि कुठली तेही समोर येईल. पण आताच्या घडीला एवढचं समोर आणलं आहे की, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी या सरकारकडे पैसे नाहीत. कॉन्ट्रॅक्टरचे बील द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत आणि एवढे ढीगच्या-ढीग पैसे सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे आहेत मी हे जनतेसमोर आणलेले आहे. कारण आधीही अशाचपद्धतीने संजय शिरसाट यांच्या घरातला व्हिडीओ समोर आला होता. आता घरातला व्हिडीओ तर बाहेरची माणसं काढू शकत नाही ना, असा सवाल दानवे यांनी केला. तर मग घरातला व्हिडीओ समोर आला होता नोटांच्या बॅगेची बॅग भरलेल्या. आता हाही व्हिडीओ घरातलाच एका अर्थाने म्हणावा लागेल. आणि ते जे कोणी महोदय आहेत ते आमदार आहेत त्यांना या नोटा किती आहेत, काय आहेत सगळं दाखवलं जातं आणि नंतर त्या त्यांना द्यायच्या असतील. त्यामुळे हे जनतेसमोर आले पाहिजे. आताच्या घडीला सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशापद्धतीने सत्ता आणि संपत्तीचा हैदोस घातला आहे तो या व्हिडीओच्या माध्यमातून मी जनतेसमोर आणलेला आहे, असे दानवे म्हणाले.
महेंद्र दळवींना हा मॉर्फ केलेला व्हिडीओ वाटत असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावे आणि पोलिसांनी याची चौकशी करावी, असे सांगावे. पोलीस माझ्याकडे आले तर, मी त्यांना सर्व डिटेल्स सांगेन. महेंद्र दळवी यांनी व्हिडीओ खरा असल्यास आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर दानवे म्हणाले की, मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडीओ पोस्ट केलेला नाही. मी आताच्या घडीला जे पन्नास खोके एकदम ओके लोकं म्हणत होते तेव्हा काही लोकांना राग येत होता. पण खोक्यांचेच राजकारण सगळं चालू आहे हे दाखवण्यासाठी मी तो पोस्ट केला. माझं त्यांच्याशी वैयक्तिक राजकीय काही नाही, त्यांनी खुशाल काय करायचे ते करावे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, मी त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केलेले नाहीत, करणार नाही. आताच्या सत्ताधारी पक्षाचे लोकं कशापद्धतीने जनतेची लूटमार करत आहेत. हे पैसे त्यांच्या शेतातून, फॅक्टरीतून येत नाहीत. मग सगळे टेंडर्स, राजकारण, याची त्याची टक्केवारी घेणं, बदल्यामध्ये पैसे घेणे याच्यातला हा सगळा पैसा आहे. माझा मुद्दाच तो आहे. राजीनामा, त्या विषयाशी घेणंदेणं नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अंबादास दानवेंकडे गेला, असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला. याबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, तटकरेंचे आणि माझे तसे मागच्या वर्षभरापासून बोलणे नाही. लग्नकार्यात कुठेतरी भेट झाली असेल आणि माझ्या मोबाईलवरून या वर्षात फोन, बोलणे झालेले नाही. आधी ज्यावेळी आम्ही एकत्र होतो त्यावेळी बोलणं होत असेल. पण आता तरी तटकरेंशी माझे बोलणे नाही. व्हिडीओ माझ्याकडे कसा आला तो सोर्स सांगण्याची आवश्यकता नाही. पण मला वाटतं जी गोष्ट आहे त्याचा खुलासा करावा. तो तटकरेंकडून आला किवा राजीनामा देणं हे सगळं सोडून द्या. हा व्हिडीओ तुमचा आहे की नाही ते सांगा? नाहीतर पोलिसात तक्रार करा. पोलिसांना चौकशी करू देत, असे आव्हान दानवे यांनी दिले.
गेल्यावेळी गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्यावर कारवाई झाली नाही आता महेंद्र दळवी यांच्यावर कारवाई होईल या प्रश्नावर दानवे म्हणाले की, जसे महेंद्र दळवी आहेत. तसेच समोर लाल शर्टवर पैसे मोजणारी व्यक्ती पण आहे. तिचा चेहरा दिसत नाही. मला तर सगळ्यात दोषी ती व्यक्ती वाटत आहे. सगळ्यात महत्वाचे. जर पोलिसांनी ठरवलं तर सगळ्या गोष्टी सहज करू शकतात. मग पैसे कुठून आले, काय आले किती आले हे पोलीस तपासू शकतात. अधिवेशन सुरू आहे त्यात विषय होईल. संजय शिरसाटांचा व्हिडीओ शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी शेअर केला होता. संजय शिरसाटांच्या बेडरुममधला हा व्हिडीओ आहे. तिथे तर संजय राऊत गेले नव्हते. त्यांच्याच शुभचिंतकाने तो दिला असेल. त्यांच्या पक्षातला तो असू शकतो. त्यांच्या घरातला तो असू शकतो. बेडरुममध्ये थोडीच कोणी बाहेरच्या व्यक्तीला जायला देतं. जवळच्या व्यक्तीलाच जायला देतो. त्याच्यामध्ये संजय शिरसाटांनीही आपल्याकडे काय होतंय ते शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आता याच्यातही तटकरे, राजीनामा या विषयाशी आम्हाला देणं घेणं नाहीय. याविषयाची चौकशी व्हावी, असे दानवे म्हणाले.
महेंद्र दळवी यांच्यासोबत समोरची व्यक्ती आहे त्याचाही तपास पोलिसांनी घ्यावा, समोरची व्यक्ती कोण आहे? मी ओळखतो म्हणूनच व्हिडीओ ट्विट केला आहे. मी न ओळखता ट्विट केलेले नाही. पोलिसांनी चौकशी करावी एवढेच माझे खुले आवाहन आहे. एवढ्या नोटा मोजणारा व्यक्ती त्याहीपेक्षा मोठा असेल. येईल समोर. चेहरा दिसत नाही त्यामुळे तो मी नव्हेच असेच म्हणेल. आता पुढचा व्हिडीओ त्याचा चेहराच येईल. मग बघूया. माझा मुद्दा हा आहे की, महाराष्ट्राची संस्कृती कशी खोक्यांची केलेली आहे. अधिवेशनात काय होतयं, सरकार काय घोषणा करतो, आम्ही काय प्रश्न विचारतो हे सगळं मला माहित आहे, त्यातून काय निघतं हेही मला चांगले माहित आहे. मात्र या महाराष्ट्रात कशाप्रकारे राजकारपण सुरू आहे, कशापद्धतीने खोक्यांचे राजकारण सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचा कसा उन्माद सुरू आहे, हे या निमित्ताने समोर आणायचे आहे, असे दानवे पुढे म्हणाले.
शेतकऱ्यांना 31 हजार 800 कोटींचे पॅकेट जाहीर केले. राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले, अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पटलावर यांनी आतापर्यंत किती रक्कम कोणत्या कोणत्या जिल्ह्यात दिली त्याची माहिती द्यावी. आम्ही गावोगाव फिरून आलो आहोत आणि पुन्हा फिरणार आहोत. या सरकारचा पंचनामा करणार आहोत. घोषणा करतात हेक्टरी वेगळी आणि प्रत्यक्षात मदत वेगळी आहे. सहा सहा रुपयांचा चेक शेतकऱ्यांना आलेला आहे. काहींनी माझ्याकडे व्हॉट्सअॅप पाठवलेला आहे. काहींनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात सांगितले आहे, अशी माहितीही अंबादास दानवे यांनी दिली.




























































