ईडी सरकारच्या काळात फक्त घोटाळे आणि फसवणूक, दानवेंनी पुरावेच सादर केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे केंद्रातील सरकार असो किंवा राज्यातील ‘ईडी’ सरकार, दोघांकडूनही जनतेची फसवणूक आणि घोटाळेबाज कारभार सुरू असल्याचा घणाघात करीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरावेच सादर केले. निवडणुकीआधी जाहीरनाम्यात आश्वासने द्यायची आणि निवडून आल्यावर जनतेला वाऱ्यावर सोडायचे असा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले.

भाजपने 2014च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर अटलजींसह सर्व ज्येष्ठ नेत्यांची छायाचित्रे होती. मात्र 2019च्या निवडणुकीत केवळ मोदींचाच फोटो होता. यानंतर देशात अक्षरशः एकाधिकारशाही, मनमानी सुरू आहे. शेतकऱयांना हमीभाव, शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट करणाऱ्या स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, व्याजमुक्त किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री फसल विमा योजना अशा सर्व योजनांच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक झाली. राज्यात खरीपाचा 2022 चा विमा, गुणवत्तापूर्ण बियाणी मिळत नसून कृषिमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार झाला आहे. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे उन्हाळी कांदाही खरेदी करा, अशी मागणीही त्यांनी केली.

1200 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकरीविरोधी धोरणामुळे ईडी सरकारच्या काळात तब्बल 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दररोज 70 महिला बेपत्ता होत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. ‘हर घर नल’ आला, मात्र पाण्याचा पत्ता नाही. नियमित कर्जफेड केलेल्यांना 50 हजार प्रोत्साहनपर भत्ता देणे रखडले आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेत 46 लाख शेतकऱयांना वगळण्यात आले. गुजरातमध्ये एक लिटर दुधाला 40 रुपये मिळत असताना महाराष्ट्रात केवळ 25 रुपये मिळतात. कापसाचा भाव 12 हजारवरून सहा हजार झाला. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही सर्व माहिती राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.