अंबरनाथ-बदलापूर दरम्यान नवे रेल्वे स्थानक

2848

कर्जत लोकलने प्रवास करताना तुम्हाला मध्येच ‘अगला स्टेशन चिखलोली..’ अशी अनाऊन्समेंट लोकलमध्ये ऐकायला आली तर आश्चर्च वाटून घेऊ नका. कारण अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान चिखलोली हे नवे स्थानक होणार असून त्याचा कन्सेप्ट  प्लानदेखील मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) तयार केला आहे. हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होणार असून अंबरनाथ व बदलापूर स्थानकांवरील ताणदेखील दूर होणार आहे. चिखलोली रेल्वे स्थानकामुळे येथील विकासाला खऱया अर्थाने चालना मिळेल.

अंबरनाथ व बदलापूर दरम्यानचे अंतर 7.44 किलोमीटर एकढे आहे.  चिखलोली गाव अंबरनाथपासून 4.34 व बदलापूरपासून 3.1 किलोमीटर अंतरावर आहे. अंबरनाथ व बदलापूर या दोन्ही शहरांची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून तिथे मोठय़ा प्रमाणावर नवी गृहसंकुले होत आहेत. त्याचा ताण ऐन गर्दीच्या वेळी अंबरनाथ व बदलापूर स्थानकांत होतो. दोन्ही स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी होते. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान  नवे रेल्वे स्थानक करावे, अशी मागणी सुमारे 15 वर्षांपासून करण्यात येत होती. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गेल्या वर्षी हे स्थानक उभारण्यास मान्यता दिली.

हा चिखलोली स्थानकात दोन फलाट असून प्राथमिक आराखडा एमआरव्हीसीने तयार केला आहे. या स्थानकात प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्राथमिक सुविधा दिल्या जाणार आहेत.

हा मध्य रेल्वेने एमआरव्हीसीने तयार केलेल्या कन्सेप्ट प्लानला मंजुरी मिळताच प्रत्यक्षात फलाट उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती एमआरव्हीसीचे जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार पटके यांनी दिली.

प्रवाशांची मागणी व गरज लक्षात घेऊन चिखलोली रेल्वे स्थानक उभारावे यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे.

दोन अतिरिक्त मार्गिका

चिखलोली रेल्वे स्थानकाचा आराखडा एमआरव्हीसीने तयार केला असतानाच कल्याण ते बदलापूर दरम्यान 14 किलोमीटर लांबीच्या दोन स्वतंत्र मार्गिका टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दीड हजार कोटींची ही योजना असून त्यासाठी 17 गावांचे पुनर्वसन करावे लागेल. त्याचीही तयारी सुरू केली आहे. पाच वर्षांत या दोन मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून एका मार्गाचा वापर गुड्स ट्रेन व मेल-एक्प्रेससाठी तर दुसरी मार्गिका लोकलसाठी होईल. त्यामुळे लोकल वाहतुकीमध्ये 25 टक्क्यांनी वाढ होईल, असा विश्वास अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.

फलाटांची उंची वाढविणार

विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर स्थानकांतील फलाटांची उंची वाढविण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 15 डब्यांच्या लोकल या मार्गांवर थांबू शकतील. सध्या फक्त 12 डब्यांच्या लोकल्स थांबतात. त्याचाही फायदा लाखो प्रवाशांना होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या