अंबाजोगाईत गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा, शिक्षकाने विद्यार्थीनीवर केला बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षण क्षेत्राचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाईत गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोलेश्वर विद्यालयामध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेतील क्रीडा शिक्षकाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर विद्यालयामध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर याच शाळेतील क्रीडा शिक्षकाने बलात्कार केला आहे. क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी ही मुलगी शिक्षकासोबत बाहेरगावी गेली होती. स्पर्धेतून परतत असताना वाहनामध्ये शिक्षकाने तिच्यासोबत छेडछाड केली आणि नंतर अंबाजोगाई येथे वाहनामध्येच 17 ऑक्टोबर रोजी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कोणालाही सांगू नकोस असे शिक्षकाने विद्यार्थीनीला धमकावले होते. त्यानंतर त्या मुलीवर नराधम शिक्षकाने अनेक वेळा अत्याचार केल्याचेही समोर येत आहे.

पीडित मुलगी भयभीत अवस्थेमध्ये होती. तिची अवस्था शाळेमधील एका महिला शिक्षकाच्या लक्षात आल्यानंतर तिने विद्यार्थीनीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर या घटनेचे बिंग फुटले. त्या मुलीने अंबाजोगाई शहर पोलिसामध्ये तक्रार दिल्यानंतर शाम दिगंबर वारकड क्रीडा शिक्षक, खोलेश्वर माध्यमिक विद्यालय (वय 43) यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी राहुल धस हे अधिक तपास करत आहेत.