
सामना ऑनलाईन, पोलादपूर
शनिवार 28 जुलै… सहलीसाठी दापोलीहून महाबळेश्वरला निघालेली कृषी विद्यापीठाची बस पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात कोसळली आणि एकच हाहाकार झाला. तब्बल 30 जणांचा बळी घेणाऱ्या या भीषण दुर्घटनेतून केवळ एकच कर्मचारी चमत्कारीकरीत्या बचावला आणि हा अपघात संशयाच्या भोवऱ्यात सापडला. शनिवारी आंबेनळी घाटात कोसळलेली ती बस दुर्घटनेच्या 70 दिवसांनंतर बाहेर काढण्यात येणार असून त्याच्या केमिकल टेस्टनंतरच काय घडले… कुणी केले… स्टेअरिंगवर नेमके कोण बसले होते… हा घात की अपघात या सर्व रहस्यांवरचा पडदा उलगडणार आहे.
- अपघातावेळी दोन्ही वाहनचालकांखेरीज कोणी अन्य वाहनचालक बस चालवत होता का, याचा शोध घेतला जाणार आहे.
- काही मृतांचे मोबाईल आणि लॅपटॉप तसेच अन्य काही ऐवज आढळून येतो का, याचाही शोध घेतला जाणार आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी भरलेली बस महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात सुमारे 1200 फूट खोल दरीत कोसळली होती. या दुर्घटनेत 30 जण जागीच ठार झाले तर प्रकाश सावंत देसाई हे एकमेव कर्मचारी बचावले. त्यामुळे सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या दुर्घटनेतून संशयाचा धूर निघू लागला. मृतांच्या नातेवाईकांनी हा घातपातच असल्याचा आरोप करत प्रकाश सावंत देसाई यांच्यावरच संशय व्यक्त केला. दरम्यान डॉ. बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने या अपघाताला वाहनचालकच जबाबदार असल्याचे मत व्यक्त करून संदिग्धता निर्माण केली. त्यामुळे अखेर दरीत कोसळलेली ती बस बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे बुधवारी 3 ऑक्टोबरला बस बाहेर काढण्याची तयारी करण्यात आली. मात्र पोलादपूरमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने ही मोहीम थांबवण्यात आली. त्यामुळे आता ही बस घटनेच्या बरोबर 70 दिवसांनंतर शनिवारी 6 ऑक्टोबरला बाहेर काढण्यात येणार आहे. अपघातग्रस्त बस दरीबाहेर काढताना हवामानाची साथ मिळाल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. शेवटच्या क्षणी बसच्या स्टेअरिंगवर कोणाच्या हाताचे ठसे मिळतील याबाबत शंका असली तरी केमिकल टेस्टद्वारे अन्य काही धागेदोरे आढळून येतात का, याबाबतही प्रयत्न केले जाणार आहेत.



























































