आंबेनळी घाट… मृत्यूची वाट; एकाच दिवशी तीन ठिकाणी दरड कोसळली

ambenali ghat satara mahabaleshwar

आंबेनळी घाट सध्या मृत्यूची वाट बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्याने एकाच दिवशी आंबेनळी घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन घाटातून प्रवास करावा लागत आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे सध्या आंबेनळी घाटात ठिकठिकाणी दरड, मातीचा ढिगारा, काही प्रमाणात खाली येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर सातारा जिल्हा हद्दीत दरड कोसळली. तसेच पोलादपूर हद्दीत चिरेखिंडच्या अलीकडे आणि कापडे खुर्द गावाजवळ झाडांसह मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. यामुळे काही काळ घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने झाडे आणि मातीचा ढिगारा काढण्यास सुरुवात केली.

लाखो रुपये खर्च
आंबेनळी घाटात एकापाठोपाठ एक तीन वेळा दरड कोसळल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी पावसाच्या हंगामात कशेडीसह आंबेनळी घाटात माती व दगड कोसळत असल्याने लाखो रुपये खर्च होत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने दरडग्रस्त डोंगराची पाहणी करत उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.