
सामना प्रतिनिधी, सिंधुदुर्गनगरी
आंब्रड विभागातील सोनवडे, घोटगे, भरणी, जांभवडे कुपवडे, आंब्रड या गावातील सुमारे 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर विश्वास ठेवून आंब्रड जि. प. मतदार संघातील सोनवडे घोडगे भरणी जांभवडे कुपवडे आंब्रड या गावातील स्वाभिमान पक्षाच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेशात जांभवडे चे माजी सरपंच चिंतामणी मडव,भरणी माजी उपसरपंच विशाल मेस्त्री, राजू परब, कुपवडेचे राणेसमर्थक पी.डी सावंत, आंब्रड माजी सरपंच विकास राऊळ अनंत परब घोटगेचे बाळा गुरव, सोनवडेचे काशीराम घाडीगांवकर या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.या प्रवेशामुळे शिवसेना पक्षाने स्वाभिमान पक्षाला आंब्रड विभागात खिंडार पाडले आहे. शिवसेना आंब्रड विभागाचा जाहीर संकल्प मेळावा शनिवारी आंब्रड बाजारपेठेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वाभिमानच्या 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत भगवा झेंडा हाती घेतला. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सर्व प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधण्यात आले.
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, ”लोकप्रतिनिधी म्हणून पक्षाच्या बाहेर जाऊन काम करणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. लोकांनी खासदार म्हणून आपल्याला निवडून दिल्यानंतर आम्ही कधीच गावच्या विकासात पक्षभेद मानले नाहीत. म्हणूनच आबा मुंज यांच्या मागणीवरून आंब्रड ग्रामपंचायतीसाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून 12 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. प्रलंबित असलेले सोनवडे घाट, आनंदवाडी बंदर, अरुणा प्रकल्प यासाठी भरघोस निधी आम्ही मंजूर करून आणला आहे. वैभव नाईक यांच्या रूपाने सूज्ञ व विचारी आमदार आपल्या मतदार संघाला लाभले हे येथील मतदारांचे भाग्य आहे” असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, ”शिवसेना पक्षात असलेली सर्वच मंडळी विकासासाठी धडपडत आहे. निवडणुकीवेळी आम्ही जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. त्यामुळेच लोक आमच्यावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश करत आहेत. आंब्रड विभागात चांदा ते बांदा योजनेतून अनेक बंधारे, 25/15 मधून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे जनता त्यांच्यावर विश्वास ठेवेल आणि विनायक राऊत हे पुन्हा एकदा 2 लाख मतांनी निवडून येतील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत प्रवेश कर्त्यांचा शिवसेना पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल असे सांगितले.
याप्रसंगी ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख, सुनील वेंगुर्लेकर, जि.प. गटनेते नागेंद्र परब, जि.प. सदस्य संजय पडते, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, उप तालुका प्रमुख महेश सावंत, विभाग प्रमुख दिनकर परब, निशांत तेरसे, सागर वाळके, शेखर परब, बाबा मेस्त्री, सचिन कदम, सुशील परब, संकेत पांगम, संदीप बागवे, प्रिया परब, गितेश सावंत, विजय परब ,बाळू पारकर आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


























































