प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आपल्या आवाजातील जादूमुळे घराघरात पोहोचलेले लोकप्रिय रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथेच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमीन सयानी यांचा मुलगा राजील सयानी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. अमीन सयानी यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

अमीन सयानी यांनी आपल्या आवाजाने आणि कार्यक्रमांच्या सादरीकरणाने देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्धी मिळवली. बिनाका गीतमाला हा त्यांचा प्रसिद्ध कार्यक्रम रेडिओ सिलोनवर प्रसारित झाला. प्रत्येक आठवड्याला अनेक रेडिओप्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुरतेने त्यांची वाट पाहायचे.अमीन सयानी यांनी 1951 मध्ये रेडिओ करिअरला सुरुवात केली. भूत बांगला, तीन देवियां, कतला यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी निवेदक म्हणून काम केले होते.

1952 साली रेडिओवर ‘गीतमाला’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. या कार्यक्रमामुळे अमीन सयानी यांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त 7 गाणी होती. परंतु त्यांची संख्या हळूहळू वाढत 16 पर्यंत पोहोचली. या शोच्या यशाने सयानी यांचे रेडिओ व्यक्तिमत्व म्हणून स्थान मजबूत झाले.अमीन सयानी यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. सुमारे 19 हजार जिंगल्सना आवाज देण्यासाठी अमीन सयानी यांचे नाव लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे.