अमेरिकेत रेकॉर्ड ब्रेक रुग्णवाढ; स्पेन, इंग्लंडमध्ये लॉकडाऊनच्या विरोधात हिंसाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचा कहर झाला आहे. काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे.

जगात आतापर्यंत 4 कोटी 60 लाखांपेक्षा अधिक जण कोरोना संक्रमित असून सुमारे 12 लाख मृत्युमुखी पडले आहेत. तीन कोटी 34 लाख 79 हजार लोक बरे झाले झाले आहेत.

त्यातही अमेरिकेची चिंता खूप वाढली आहे. अमेरिकेत शनिवारी एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले. स्पेन देशात तर लॉकडाऊनच्या विरोधात लोक रस्त्यांवर उतरले असून हिंसक घटना घडत आहेत.

अमेरिकेत अवघ्या दोन दिवसांवर राष्ट्राध्यक्ष निवडणूक आहे. त्याआधी अमेरिकेने कोरोना रुग्णसंख्येत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. शनिवारी अमेरिकेत एक लाख 233 नव्या रुग्णांची भर पडली असून त्यांनी हिंदुस्थानलाही मागे टाकले.

हिंदुस्थानात सप्टेंबरमध्ये एका दिवसात 97 हजार 894 एवढे सर्वाधिक रुग्ण सापडले होते. अमेरिकेत निवडणूक प्रचारात लोक कोणतीही खबरदारी न घेता सहभागी होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प स्वतः मास्क लावत नाहीत की सुरक्षित अंतर नियमांचे पालन करत नाहीत.

स्पेनमध्ये हिंसाचार

स्पेन देशात पुन्हा लॉकडाऊन केल्यामुळे लोक रस्त्यावर उतरून जोरदार विरोध करत आहेत. त्यामुळे स्पेन सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

सुरक्षारक्षकांनी आंदोलनकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्यामुळे हिंसक घटना घडल्या आहेत. राजधानी माद्रिद येथे शनिवारी रात्री लॉकडाऊनला विरोध करणाऱया लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. कोरोनाच्या दुसऱया लाटेची शक्यता बघता स्पेन सरकारने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडमध्ये लॉकडाऊन

इंग्लंडमध्ये विरोधी पक्ष आणि काही सत्ताधारी खासदार यांच्या विरोधाला न जुमानता पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये एपूण 10 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत.

लॉकडाऊनला जोरदार विरोध करत लोक रस्त्यांवर उतरले आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये कोणतीच कमी राहणार नाही, याची ग्वाही सरकारच्या वतीने दिली जात आहे. तरी लॉकडाऊनला हिंसक विरोध सुरू आहे.

रशियात आरोग्य यंत्रणा सज्ज

रशियामध्ये शनिवारी 18 हजार नवे कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने सर्व रुग्णालये आणि मेडिकल सेंटर्सला सज्ज राहायचा इशारा दिला आहे.

एका दिवसात रशियात 366 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 14 हजार रुग्ण बरे झाले आहेत. थंडीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यादृष्टीने खबरदारी घेण्यात येत आहे.