
बांगलादेशमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर लादण्यात आलेला टॅरिफ अमेरिकेने कमी केला आहे. अमेरिकेने बांगलादेशला हिंदुस्थानच्या बरोबरीत बसवत टॅरिफ थेट 19 टक्क्यांवर आणला आहे. यामुळे बांगलादेशच्या वस्त्रोद्योगाला दिलासा मिळाला आहे. बांगलादेशचे अंतरिम मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. याआधी अमेरिकेने हिंदुस्थानवरील टॅरिफही 18 टक्क्यांवर आणला होता.
मोहम्मद युनुस यांनी एक्सवर एक पोस्ट करत अमेरिकेने टॅरिफमध्ये कपात केल्याची माहिती दिली. बांगलादेशातून होणाऱ्या आयातीवर अमेरिकेने 19 टक्के टॅरिफ लागू केला असून एका नवीन द्विपक्षीय व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार अमेरिकन कच्च्या मालाचा वापर करून तयार केलेल्या निवडक कापड आणि तयार कपड्यांना अमेरिकेत शुक्ल लागणार नाही, अशी माहिती युनुस यांनी दिली.
गतवर्षी एप्रिल महिन्यात अमेरिकेने बांगलादेशमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर 37 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. मात्र दोन्ही देशातील सखोल चर्चेनंतर ऑगस्ट महिन्यात हे टॅरिफ 20 टक्क्यांपर्यंत खाली आले होते. आता ते 19 टक्क्यांवर आणण्यात आल्याची माहिती युनुस यांनी दिले. या संदर्भात झालेल्या करारामुळे जागतिक वस्त्रोद्योग पुरवठा साखळीत बांगलादेशचे स्थान मजबूत होणार असल्याचे युनुस म्हणाले.
बांगलादेशचे वाणिज्य सल्लागार शेख बशीर उद्दीन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलिलूर रहमान यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे. तर अमेरिकेकडून या करारावर राजदूत आणि अमेरिकन व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी स्वाक्षरी केली आहे. हा करार अमेरिकेच्या व्यापार धोरणात बांगलादेशचे स्थान अधिक मजबूत करेल, असे ग्रीर यांनी म्हटले. तसेच, दोन्ही देश बांगलादेशातील ‘नॉन-टॅरिफ’ अडथळे दूर करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.
वस्त्रोद्योगाला दिलासा
बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेसाठी वस्त्रोद्योग हा कणा आहे. बांगलादेशच्या एकूण निर्यात उत्पन्नापैकी 80 टक्क्यांहून अधिक वाटा वस्त्रोद्योगाचा आहे. सुमारे 40 लाख कामगार या क्षेत्रात कार्यरत असून त्यापैकी बहुतांश ग्रामीण भागातील स्त्रिया आहेत. देशाच्या जीडीपीमध्येही वस्त्रोद्योगाचा वाटा 10 टक्के आहे. त्यामुळे अमेरिकेसोबत झालेल्या करारामुळे वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे.



























































