सोन्याचा दर वाढता वाढे, प्रति तोळा 42 हजारांवर; सात वर्षांतील उच्चांकी झळाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणने इराकमधील अमेरिकन सैन्य तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दराने एक नवा उच्चांक गाठला आहे. सोने प्रति तोळा 42 हजारांवर पोचले आहे. हा गेल्या सात वर्षातील उच्चांक आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 5.5 टक्क्यांची वाढ झाली असून या आर्थिक वर्षात सोन्याच्या दरात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर घरगुती बाजारपेठेत चांदीच्या दरांनी उच्चांक वाढला असून ते 48 हजार 875 रूपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. अमेरिका- इराणच्या युद्धाच्या भीतीने सोन्याचा भावात तीन हजार रुपयांची वाढ झाली होती. युद्धाचे सावट दूर होईल असे वाटताच दर थोडा खाली आला. आर्थिक मंदी, चीन-अमेरिका ट्रेड वॉर, युरोपियन बँकांची वाढलेली सोनेखरेदी त्यामुळे सोने बाजाराला तेजी आहे, अशी माहिती जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे पश्मिच विभागाचे अध्यक्ष आशीष पेठे यांनी दिली.

शहर प्रति तोळा (रुपये)

  • मुंबई 41,150
  • चेन्नई 42,860
  • कोलकाता 41,780
  • दिल्ली 41,280
  • अहमदाबाद 41,630

दहा दिवसांत दोन हजारांची वाढ

घरगुती बाजारपेठेत एका दिवसात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 450 रुपयांची तर गेल्या दहा दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात सोन्याची आयात होत असते. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरणही सोन्याच्या दरवाढीमागील कारण आहे.