
अमेरिकेच्या एफबीआय अर्थात सिक्रेट सर्व्हिसने दहशतवादाचा मोठा कट उधळला आहे. उत्तर कॅरोलिनातील मिंट हिल येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला किराणा दुकान आणि रेस्टॉरंटवर हल्ला करण्याचा कट होता. या प्रकरणी दहशतवादी संघटना ISIS पासून प्रेरित असलेल्या 18 वर्षीय ख्रिश्चन स्टर्डिव्हंटला अटक करण्यात आली आहे.
आरोपीची ओळख ख्रिश्चन स्टर्डिव्हंट (18) अशी झाली आहे, स्टर्डिव्हंट हा मिंट हिलचा रहिवासी आहे आणि बर्गर किंगमध्ये काम करत होता. तपासकर्त्यांच्या मते, तो जवळपास एक वर्षापासून हल्ल्याची योजना आखत होता. तो चाकू आणि हातोड्याने हल्ला करण्याची तयारी करत होता, जेणेकरून शक्य तितक्या निष्पाप लोकांना लक्ष्य करता येईल. एफबीआयच्या चार्लोट फील्ड ऑफिसने सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, एफबीआय आणि त्याच्या भागीदारांनी उत्तर कॅरोलिनातील मिंट हिल येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला होणारा दहशतवादी हल्ला रोखण्यात यश आले आहे. हा दहशतवादी ISISने प्रेरित झाला असल्याचे एफबीआयच्या शार्लोट फील्ड ऑफिसने त्यात म्हटले आहे. आमच्या संयुक्त दहशतवाद टास्क फोर्स आणि प्रादेशिक भागीदारांचे आभार त्यांनी व्यक्त केले आहेत.
एफबीआयच्या म्हणण्यानुसार, स्टर्डिव्हंटने डिसेंबर2025 मध्ये सोशल मीडियावर ISISला पाठिंबा देणाऱ्या अनेक पोस्ट केल्या होत्या, ज्यात हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिमांचा समावेश होता. गेल्या महिन्यात अधिकाऱ्यांना कळले की तो ISISचा माजी नेता अबू बकर अल-बगदादीशी संबंधित असलेल्या एका खात्याशी जोडलेला होता तेव्हा तपास सुरू झाला.
स्टर्डिव्हंटला 31 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आणि शुक्रवारी त्याला फेडरल कोर्टात हजर करण्यात आले. त्याची पुढील सुनावणी 7 जानेवारी रोजी आहे. दोषी आढळल्यास त्याला जास्तीत जास्त 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते.






























































