अरेच्चा, वर्षभर घरात राहिल्याने उड्डाणच विसरले! अमेरिकेत वैमानिकांना पुन्हा प्रशिक्षण देण्याची गरज

गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाशी अवघे जग सामना करत आहे. काही देशांमध्ये हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. उद्योग-वाहतूक सेवा पूर्ववत होत आहेत. अमेरिकेनेही विमान सेवा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर पायलट मंडळींना परत कामावर बोलावले आहे. मात्र दीर्घ काळ विमान उड्डाणांपासून दूर राहिल्यामुळे अनुभवी पायलटच्या हातून चुका होऊ लागल्या आहेत. अशा चुका ज्या त्यांनी याआधी केल्या नव्हत्या. यातील गांभीर्य लक्षात घेऊन कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून पायलटना पुन्हा प्रशिक्षण दिले जाणार आहे.

वैमानिकांनी केलेल्या चुका नासाच्या सेफ्टी रिपोर्टींग सिस्टीममध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. एका वैमानिकाचे लँडिंग करताना नियंत्रण सुटल्याने विमान खड्डय़ातच पडले, तर दुसरा एक वैमानिक अँटी आयसिंग सिस्टीम सुरू करण्यास विसरला. काही जण तर विमान कोणत्या उंचीवर उडवायचंय, तेच विसरले. एक वैमानिक तर कम्युनिकेशन सिस्टीम नीट वापरू शकला नाही.

लॉकडाऊनमध्ये विमान सेवा बंद असल्याने विमानं एका जागेवरच आहेत. तसंच वैमानिकही त्यांच्या कामापासून दूर आहेत. यासंदर्भात ब्रिटिश चार्टर एअरलाईन्स ‘टायटन एयरवेज’चे माजी वैमानिक जो टाऊनशेड म्हणाले, ‘‘विमान उडवणे सायकल चालवण्यासारखे नाही. एक वैमानिक 10 वर्षांच्या काळानंतरही विमान उडवू शकतो. मात्र त्याला अन्य ऑपरेशन्समध्ये अडचणी येतात. विविध सूचनांवर अंमल करावा लागतो. अशा वेळी डोक्याने एकदम फीट असावे लागते.’’

आपली प्रतिक्रिया द्या