
उत्तर अमेरिकेच्या उटा राज्यात एक असा प्रदेश आहे, जिथे कित्येक किलोमीटर दूर दूरवर काहीच नाही… फक्त वाळवंट, पर्वतरांगा आणि जंगली प्राणी… कुठेही हिरवळ नाही. या प्रदेशाला बघून मंगळ ग्रहावर आल्यासारखेच वाटते. याच भागात रहस्यमय खांब आढळला आहे. हा त्रिकोणी धातूचा खांब तिथे कुणी रोवला, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे.
धातूचा खांबाला विज्ञानाच्या भाषेत ’मोनोलिथ’ असे म्हणतात. उटाच्या निर्जन प्रदेशात मोनोलिथ नेमका आला कुठून, तो कुणाचा आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मोनोलिथ हा निसर्गनिर्मित असू शकतो किंवा मानवनिर्मित असू शकतो. एका मोठय़ा खांबासारखा तो दिसतो. त्याला काही लोक ऑब्लिस्क असेही म्हणतात. उटा भागात आढळलेला मोनोलिथ हा 10 ते 12 फूट लांब चकचकीत धातूचा आहे. त्याचे एक टोक जमिनीखाली गाडलेले आहे. तो धातूचा असूनही त्यावर अजिबाज गंज चढलेला नाही. उटाचे डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टी (डीपीएस) कर्मचाऱयांना तो हेलिकॉप्टरमधून दिसला. त्यांनी मोनोलिथचा व्हिडिओ तयार केला असून युटय़ूबवर अपलोड केला. डीपीएसच्या हेलिकॉप्टरचा वैमानिक ब्रेट हचिंग्स यांनी सांगितले, याआधी या भागांत अशी वस्तू कधीच बघितली नव्हती. आम्हाला आधी वाटले की ही नासाचे उपकरण असावे किंवा कुणा कलाकाराची कारागिरी असावी.
– रहस्यमय खांबाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. युटय़ूब आणि अन्य सोशल मीडियावर याबाबत अनेक थिअरी तयार केल्या जात आहेत. अगदी परग्रहावरील जीवाचा म्हणजेच ’एलियन’ची शक्यताही वर्तवली जात आहे.
– 1968 साली प्रदर्शित झालेल्या ’2001-ए स्पेस ओडिशी’ या हॉलिवूडपटात मोनोलिथचा संदर्भ आलेला आहे. ’मार्कल-एजेंट्स ऑफ शील्ड’ या अलीकडच्या सुपरहिट वेबसीरीजमध्येही मोनोलिथ दाखनण्यात आले आहे.