
सामना प्रतिनिधी । शिरुर अनंतपाळ
पावसाअभावी अत्यल्प प्रमाणात अवघ्या 800 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची चांगली उगवण झालेली दिसत असताना या रब्बी ज्वारीवर व मका या दोन्ही पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने अगदी बहरात आलेल्या 800 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी ज्वारीचे पीक धोक्यात आले आहे. अगोदरच दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर हे अस्मानी संकट कोसळले आहे. यावर फवारणी करण्यासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागणार असल्याने शेतकरी पुर्णतः कोलमडून गेला आहे. निसर्गाच्या या दुष्ट चक्रामुळे शेतकरी परेशान झाला आहे. मान्सून पुर्व पावसाने दमदार सुरुवात केली असली तरी पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने रब्बी हंगाम धोक्यात आले.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात अवघ्या 1 हजार ६00 हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला असून परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने फक्त बागायतदार शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचा पेरा केला आहे. पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहु शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणीच केली नाही. निसर्गाच्या लहरीपणा त्यात एक तर पिकत नाही पिकलंच तर विकत नाही असा दुहेरी फटका शेतकऱ्याच्या नशिबी सतत बसत असल्याने जगाचा पोशिंदा आज दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. या वर्षी पावसाची मान्सूनपूर्व पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या पिके ही चांगली आली. पण पिकांच्या उमेदीच्या काळात पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीनसह खरीप हंगाम मधील सर्व पिके पावसाअभावी उत्पादनात मोठी घट झाल्याने हातची गेली. आता परतीचा पाऊस पडला नसल्याने रब्बी हंगाम ही धोक्यात आले आहे. दरम्यान, परतीचा पाऊस पडेल व रब्बी पिकेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने या वर्षी रब्बी हंगामासाठी 19 हजार 800 हेक्टर एवढे क्षेत्र उपलब्ध असताना त्यातून फक्त ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे. अशा 1 हजार ६00 हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांचा पेरा झाला आहे. यात 750 हेक्टर क्षेत्रावर हरभरा, 800 हेक्टर वर रब्बी ज्वारी तर 50 हेक्टर क्षेत्रावर करडी व चारा वर्गीय पिकांचा पेरा झाला आहे. शिरूर अनंतपाळ तालुका हा प्रकल्पाचा तालुका म्हणून ओळखला जात असला तरी या तालुक्यात सिंचनाच्या सुविधा नसल्याने कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात रब्बी हंगामाची पुर्ण भिस्त ही परतीच्या पावसावर अवलंबून असते. पण या वर्षी परतीचा पाऊस पडला नसल्याने 19 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर होणाऱ्या रब्बी हंगामाच्या पिकांचा पेरा फक्त 1 हजार ६00 हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. अशात बागायती शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी ज्वारी बहरली असताना या रब्बी ज्वारीसह मकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
या रोगात ज्वारीच्या पानावरील अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या पानाचा हिरवा पापुद्रा खातात. त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडतात. दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानाला छिद्रे करतात पानाच्या कडा खातात, अळ्या मका व ज्वारीच्या पोंग्यामध्ये राहून पानाला छिद्रे करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसतात. सर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोन अळ्या राहतात. जुनी पाने मोठ्या प्रमाणात पर्णहीन होऊन पानाच्या फक्त मध्य शिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते. पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते. मध्यम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त तर उशिरा पोंगे अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. त्यामुळे ज्वारीचे पीक धोक्यात येऊन उत्पादनात घट होते. सोयाबीन हातचे गेल्याने अगोदरच अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यावर हे अस्मानी संकट कोसळल्याने त्यावर फवारणी करण्यासाठी जवळ पैसे नसल्याने आता उसणवारी किंवा सावकाराकडून व्याजी पैसे काढून फवारणी करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीवर वेळीच फवारणी करावी. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सरासरी 5 टक्के प्रादुर्भावग्रस्त पीक आढळल्यास लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 5 टक्के निमार्क, डायमेथोयट 30टक्के 12.50 मिली किंवा थायोमेथोक्झाम 12.६ टक्के, लँबडा सहलोथ्रीन 9.5 टक्के 2.5 मिली, किंवा क्लोरँट्रॅलीनीप्रोल 18.5 टक्के 3 मिली साध्या फवाऱ्यासाठी प्रमाण घ्यावे व पावर स्प्रे साठी 3 पटीने प्रमाण वाढवुन घ्यावे. तसेच फोरेट 10 टक्के दाणेदार (सिजी) 10 किलो/हेक्टरी जमिनीत थोडी ओल असताना पेरून किंवा फेकुन टाकावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.बी. सोनवर व कृषी सहाय्यक राजेश मुळजे यांनी केले आहे.
































































