पहिला सेट गमावल्यानंतर जोकोविच सावरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात या ना त्या कारणामुळे चर्चेत असलेला स्टार खेळाडू नोवाक जोकोविच याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील दुसऱया फेरीचा अडथळा ओलांडला खरा पण यावेळी त्याला थोडा अडचणीचा सामना करावा लागला. युनायटेड किंगडमच्या काईल एडमंड याने पहिला सेट 7-6 अशा फरकाने जिंकला. या धक्क्यामधून सावरत नोवाक जोकोविच याने पुढील सेट 6-3, 6-4, 6-2 अशा फरकाने जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला.

33 वर्षीय नोवाक जोकोविच याने या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून दुखापतींवर मात करीत झोकात पुनरागमन केले. आता त्याला 18व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचे वेध लागले आहेत. याआधी रॉजर फेडररने सर्वाधिक 20 व रफाएल नदालने 19 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवलीय. अमेरिकन ओपन स्पर्धेत नोवाक जोकोविच याने बाजी मारल्यास त्याला रॉजर फेडरर व रफाएल नदाल यांच्याजवळ पोहोचता येणार आहे. तसेच या वर्षी आतापर्यंत तो एकाही लढतीत पराभूत झालेला नाही.

दिविज, निकोला पराभूत

हिंदुस्थानचा टेनिसपटू दिविज शरण व त्याचा साथीदार निकोला कॅचिच या जोडीला अमेरिकन ओपन स्पर्धेतील दुहेरीच्या लढतीत निकोला मेकटीच व वेस्ली कुलहोफकडून हार सहन करावी लागली. दिविज शरण व निकोला कॅचिच जोडीला 4-6, 6-3, 3-6 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

अव्वल सीडेड फ्लिस्कोवाचे आव्हान संपुष्टात

महिला गटातील अव्वल सीडेड कॅरोलिना फ्लिस्कोवा हिचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. फ्रान्सच्या कॅरोलीन गार्सियाकडून तिला एकेरीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. कॅरोलीन गार्सियाने कॅरोलिना फ्लिस्कोवावर 6-1, 7-6 अशा फरकाने विजय मिळवत स्पर्धेत मोठा उलटफेर केला आणि पुढे पाऊल टाकले.

चार सेटच्या थरारानंतर झ्वेरेव विजयी

पाचव्या सीडेड ऍलेक्झॅण्डर झ्वेरेवला तिसऱया फेरीत पोहोचण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला. जर्मनीच्या या पठ्ठय़ाला चार सेट व दोन तास 55 मिनिटांच्या झुंजीनंतर विजय मिळाला हे विशेष. ऍलेक्झॅण्डर झ्वेरेवने वाईल कार्ड एण्ट्री मिळालेल्या अमेरिकेच्या ब्रॅन्डन नाकाशिमा याच्यावर 7-5, 6-7, 6-3, 6-1 अशा फरकाने विजय मिळवला.