खेळपट्टीचा हॉरर शो!

अमेरिकेतल्या ड्रॉप इन म्हणजेच रेडीमेड खेळपट्टय़ा फलंदाजांसाठी हॉरर ठरताहेत. मग ती न्यूयॉर्कची खेळपट्टी असो किंवा डल्लासची. असमान असलेल्या खेळपट्टीमुळे आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपचे सारेच सामने कमी धावसंख्येचे झाले आहेत. परिणामता फटकेबाजीऐवजी विकेटचीच मेजवानी पाहायला मिळतेय.

वर्षभरात अमेरिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी स्टेडियम उभारून स्वतःची पाठ नक्कीच थोपटून घेतलीय. पण त्यांनी स्टेडियममध्ये लावलेल्या ड्रॉप इन खेळपट्टय़ांमुळे अमेरिका आणि आयसीसी दोघेही टीकेचे धनी होत आहेत. टी-20 म्हणजे चौकार-षटकारांची आतषबाजी. हेच पाहायला क्रिकेटप्रेमींची पावले मैदानाकडे वळतात. हेच या क्रिकेटचे मुख्य आकर्षण असते. पण अमेरिकेतल्या खेळपट्टय़ांनी टी-20 क्रिकेटचे रुपच बदलून टाकले आहे.

अमेरिकेच्या 2 मैदानांवर झालेल्या आतापर्यंतच्या 9 सामन्यांमध्ये फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचाच कहर पाहायला मिळालाय. बहुतांश सामने एकतर्फी असले तरी न्यूयॉर्क असो किंवा डल्लास, दोन्ही मैदानांवर फलंदाजांचे काहीएक चालले नाही. अमेरिका आणि पॅनडा यांच्यात खेळला गेलेला उद्घाटनीय सामना सोडला, तर उर्वरित सामन्यांत दीडशे धावांचा टप्पा गाठणेही हिमालयासारखे भासलेय.

श्रीलंकेचा संघ 70 धावांवर आटोपला तेव्हाच या खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले होते. पण या खेळपट्टय़ांवर जे संघ कोलमडले ते नवखे आणि दुबळे संघ होते. मग तो श्रीलंका असो किंवा नेदरलॅण्ड्स, आयर्लंड, कॅनडा आणि नेपाळ या दुबळ्या संघांचाच डाव गडगडला. याचाच अर्थ अमेरिकेच्या खेळपट्टय़ांवर नवख्या संघांचीच पंचाईत झाली आहे. पण आता याच खेळपट्टीवर हिंदुस्थानच्या बलाढय़ फलंदाजीने गुडघे टेकले. खेळपट्टीच्या घातकतेपेक्षा हिंदुस्थानी फलंदाजांच्या आत्मघाती खेळाचीच अधिक चर्चा झालीय.

रेडिमेड खेळपट्टय़ा नको रे बाबा

अमेरिकेतल्या खेळपट्टय़ांवरचा खेळ पाहिल्यावर भविष्यात वर्ल्ड कपसारख्या मोठय़ा स्पर्धांमध्ये रेडीमेड खेळपट्टय़ांचा वापर केला जाणे कठीण आहे. या ड्रॉप इन खेळपट्टय़ांबाबत सर्वच संघांनी टीका केल्यामुळे रेडीमेड खेळपट्टय़ा नको रे बाबाचा सूरच ऐकायला मिळणार, हे नक्की झालेय.

ड्रॉप-इन खेळपट्टीची गरज का पडली?

न्यूयॉर्कमधील नासाऊ स्टेडियम जानेवारी 2023पर्यंत एका रिकाम्या जागेसारखे होते. टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ‘आयसीसी’ने अमेरिकेचे यजमान पद काढून घेण्याची तयारी केली होती. मात्र अमेरिकेने स्टेडियम उभारणीची हमी घेतल्याने ‘आयसीसी’ने त्यांचे यजमान पद कायम ठेवले. मग जानेवारीतच न्यूयॉर्कमध्ये तात्पुरत्या स्वरूपातील स्टेडियमच्या उभारणीला सुरुवात झाली. मात्र डिसेंबर ते मार्चपर्यंत न्यूयॉर्कमध्ये हिवाळा असल्याने खेळपट्टी बनविणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलियात बनविलेल्या ड्रॉप-इन खेळपट्टय़ा न्यूयॉर्कच्या स्टेडियमसाठी वापराव्या लागल्या.

वर्ल्ड कपमध्ये प्रथमच ड्रॉप-इन खेळपट्टी

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियममध्ये ड्रॉप-इन खेळपट्टी वापरली जात आहे. अशा खेळपट्टय़ा मैदानाबाहेर तयार करून नंतर स्टेडियममध्ये स्थापित केल्या जातात. नासाऊ स्टेडियमची खेळपट्टी ऑस्ट्रेलियात बनविण्यात आली. या वर्षी जानेवारीमध्ये 10 खेळपट्टय़ा समुद्रमार्गे अमेरिकेतील फ्लोरिडा येथे आणण्यात आल्या होत्या. एप्रिलमध्ये त्या न्यूयॉर्कमध्ये आणण्यात आल्या. मग मे महिन्यात त्या नासाऊ स्टेडियममध्ये बसवण्यात आल्या होत्या. 10 पैकी 6 खेळपट्टय़ा सरावासाठी आहेत, तर 4 खेळपट्टय़ांवर वर्ल्ड कपचे 8 सामने होत आहेत. वर्ल्ड कपमध्ये अशा ड्रॉप-इन खेळपट्टय़ा प्रथमच वापरण्यात आल्या. शिवाय तयारीला अधिक वेळ न मिळाल्याने या खेळपट्टय़ांच्या रोलिंगसाठी आणि मेंटनससाठी पाहिजे तेवढा वेळ मिळाला नाही. खेळपट्टय़ा पूर्णतः तयार होताच येथे टी-20 वर्ल्ड कपचे सामने होत असल्याने त्याचे दृष्परिणाम आता दिसत आहेत. गोलंदाजांना या खेळपट्टीवर उसळी मिळत असून फलंदाजांना खेळणे अवघड होत आहे. परिणामी न्यूयॉर्कच्या या ड्रॉप-इन खेळपट्टीवर धावसंख्या कमी होत असल्याने सर्वत्र टीकेची झोड उडाली आहे.