अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात आमदाराने गोरगरीबांना वाटल्या घोंगड्या, व्हिडीओ झाला व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूलचे एक आमदार सोशल मीडियावर सध्या चर्चेचे विषय बनले आहेत. उकाड्याचे अंगाची लाही लाही होत असताना या आमदाराने उन्हाळ्याच्या दिवसांत गरजूंना चक्क घोंगड्या वाटल्या आहेत. त्यांच्या या अजब कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील करीमपूरची ही घटना आहे. येथे तृणमूलचे आमदार विमलेंदू सिंह रॉय गरजूंना उन्हाळ्याच्या दिवसात घोंगड्या वाटताना दिसत आहेत. या घटनेचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. पण ज्यावेळी आमदार विमलेंदू सिंह रॉय यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, ईदच्या आधी गरजूंना कपडे वाटप करण्याचा कार्यक्रम होता. तिथे कपड्यांसोबत घोंगड्याही होत्या, त्यामुळे त्या घोंगड्याही वाटल्याचे त्यांनी उत्तर दिले.

लोकं कडाक्याच्या उन्हाने हैराण झाले आहेत. देशातील अनेक भागात उन्हाचा पारा वाढला आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसात 9 राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. यासोबतच देशातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिमबंगाल, सिक्कीम, ओडीशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आणि पुडुचेरीच्या यानममध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाने 40 पार केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक शहरांचा सहभाग आहे. संपूर्ण देशात उष्णतेचा उद्रेक झाला आहे. मागच्या दिवसांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील शाळा-कॉलेज एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. असे असताना या दिवसात आमदाराने घोंगड्या वाटणे म्हणजे कहरच आहे.