काँग्रेस आमच्या रक्तात! पक्षांतराच्या चर्चांना अमित देशमुखांचा पूर्णविराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस आमच्या रक्तात आहे ही शिकवण विलासराव देशमुख यांनी आम्हाला दिली आहे, असे सांगत अमित देशमुख यांनी आज आपल्या पक्षांतराच्या चर्चांना स्वतःच जाहीरपणे पूर्णविराम दिला.

निष्ठsने समाजाचे काम करणे, राजकारण करणे, पक्षाचे काम करणे हे सगळे विलासराव देशमुख यांनी केले. त्यांच्यावर पक्षातून कारवाई झाली तेव्हाही त्यांनी सांगितले की, मला काँग्रेसमधून काढाल पण रक्तातली काँग्रेस कशी काढणार? त्यांचे ते वाक्य आजच्या राजकीय परिस्थितीतही लक्षात घेण्यासारखे आहे, आपल्याबद्दलही अनेक चर्चा सुरू आहेत, पण मी जिथे आहे तिथे ठीक आहे, असे अमित देशमुख म्हणाले.

लातूरमधील निवळी येथील विलासराव सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्याप्रसंगी अमित देशमुख बोलत होते. समाजाशी जोडलेली नाळ तोडून इकडे तिकडे जाणे असे सध्या घडतेय. पण महाराष्ट्राच्या माणसाला हे पटणारे नाही. यावर आपल्याला मात करून सामान्य माणसांचा विश्वास संपादन करायचा आहे, असे अमित देशमुख म्हणाले.

तो काळ परत आणायचा आहे
आदरणीय शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे या सगळ्यांकडे महाराष्ट्रातला माणूस आस लावून पाहतो आहे. त्याची आशा पूर्ण करायची जबाबदारी महाराष्ट्राने आपल्यावर सोपवली आहे, असे अमित देशमुख म्हणाले.

राजकारणात वैयक्तिक टीका होऊ नये
राजकारणात कुणावरही वैयक्तिक टीका करू नये असे संस्कार विलासराव यांनी आमच्यावर केले आणि तोच वारसा आम्ही भावंडे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय असे रितेश देशमुख म्हणाले. विलासराव आणि त्यांचे भाऊ दिलीपराव देशमुख यांनी भाऊ म्हणून एकमेकांना जपले असे सांगतानाच वडील गेल्यानंतर त्यांची उणीव भासू नये म्हणून काका नेहमीच आमच्या मागे उभे राहिले, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो, असे रितेश देशमुख म्हणाले.

पित्याच्या आठवणींनी रितेश देशमुख भावूक
या वेळी बोलताना अभिनेते रितेश देशमुख हे पित्याच्या आठवणींनी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, विलासराव हे माणूस म्हणून काय होते हे सांगताना त्यांना हुंदका आवरला नाही. अमित देशमुख यांनी जवळ जात त्यांना पाणी दिले आणि पाठीवर हात ठेवून धीर दिला.