Kolkata Violence – CRPF जवान नसते तर मी जिवंत राहिलो नसतो, अमित शहांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान कोलकाता येथे प्रचंड हिंसाचार झाला. दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तृणमूल काँग्रेसने केलेल्या या हल्ल्यातून आपण थोडक्यात बचावलो आहोत. तेथे सीआरपीएफचे जवान उपस्थित होते. त्यांनी आपल्याला सुखरुप बाहेर काढले. सीआरपीएफचे जवान नसते तर आपण जिवंत राहिलो नसतो, असा गंभीर आरोप अमित शहा यांनी केला. मंगळवारच्या आपल्या रो शोवर हल्ला करून तृणमूल काँग्रेसनेच हिंसाचार घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काल त्यांच्या रोड शो मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली बाजू मांडली.

भाजप हिंसचार घडवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मात्र, भाजपची सत्ता असलेल्या कोणत्याही राज्यात हिंसाचाराची घटना घडलेली नाही. देशात सहा टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले आहे. फक्त पश्चिम बंगालमध्ये सहाही टप्प्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसच घडवत असल्याचा आरोप शहा यांनी केला. या सर्व घटनांकडे निवडणूक आयोग डोळेझाक करत आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रत्येक टप्प्यानंतर भाजपने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराकडे निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले. तृणमूलच्या गुंडावर कारवाई होत नाही. तोपर्यंत निवडणूक शांतपणे आणि निःपक्षपाती वातावरणात होणार नाही असे आयोगाला सांगितले. मात्र, आयोगाने आमच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाचा दुटप्पीपणा दिसून य़ेतो असे ते म्हणाले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्याला खुलेआम धमकी दिली, त्यांच्यावर निवडणूक आयोगाने बंदी का घातली नाही, असा सवालही त्यांनी केला. पश्चिम बंगालमधील घटनांमुळे निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे असे ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये गुंडांना अटक करण्यात आली नाही, त्यांना अटक करण्याचे निर्देश निवडणूक आयोग का दिले नाही. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग बघ्याच्या भूमिकेत असून इथे बोगस वोटींग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पराभूत होणार असल्याचं स्पष्ट दिसायला लागलं आहे, त्यामुळे ममता हिंसाचार घडवत आहेत, असेही शहा यांनी म्हटले. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज नाही. आता जनताच 23 मे नंतर सरकार बदलणार आहे, असे सांगत त्यांनी तृणमूल काँग्रेसला टोला लगावला.

विरोधी पक्षांनी फक्त नरेंद्र मोदी यांनी हटवण्यासाठी आघाडी केली आहे. मात्र, सहा टप्प्यातील मतदानानंतर केंद्रात भाजपप्रणित एनडीएचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोणीही कितीही आघाडी करावी, विरोधी पक्षाचा नेता निवडण्यासाठी ते आघाडी करू शकतात. कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्याही जागा मिळाल्या नाही तर त्यांनी एकत्र येऊन विरोधी पक्षनेता ठरवावा असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप 300 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ईश्वरचंद्र विद्यासागार य़ांचा पुतळा तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी तोडला असा आरोपही शहा यांनी केला. या पुतळ्याची आणि त्यांच्या प्रतीमेची तोडफोड या घटनेने दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले. सत्ता वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी पातळी सोडली आहे, असे ते म्हणाले. कॉलेज उघडलं कोणी, खोलीची चावी कोणी दिली, खोलीतील पुतळा कसा काय तुटला, अस सवाल शहा यांनी केले. साडेसात वाजता कॉलेज बंद झालं होतं, त्यातल्या खोलीत ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा होता. तृणमूलचे कार्यकर्तेच आतमध्ये होते. त्यामुळे नुकसान कोणी केले ते स्पष्ट आहे, असे ते म्हणाले.