
मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपमध्येदेखील ही नाराजी अधिकच वाढताना दिसत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात फडणवीसांच्या अभिनंदनासाठी ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब करण्यात आला. यामुळे फडणवीस आणि शहांमध्ये सख्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात राज्यात नवे सरकार आल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीसांच्या अभिनंदनासाठी लावलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्थान देण्यात आले आहे, मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो अभिनंदनाच्या बॅनरवरून वगळत नाराजी उघड केली आहे.
नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री केले नाही याबद्दल एका पत्राच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. ते एवढय़ावरच थांबले नाहीत तर उपमुख्यमंत्रीपदावर फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी लावलेल्या फलकावरून अमित शहा यांचा फोटो गायब करून त्यांनी संताप व्यक्त केला.
विजयोत्सवाला फडणवीसांची दांडी
राज्यात भाजप सत्तेत आल्याबद्दल भाजप प्रदेश कार्यालयात आज विजयोत्सव साजरा करत जल्लोष करण्यात आला. पण या कार्यक्रमाकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठ फिरवली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशीष शेलार आदी भाजपच्या प्रमुख नेत्यांसह अनेक बडय़ा नेत्यांनी दांडी मारली.
मुख्यमंत्रीपदाचा पत्ता कुणी कापला
मविआ सरकार पाडून राज्यात नवीन सरकार आणण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भूमिका बजावली. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांच्यापर्यंत पोहचविण्याचा खटाटोप केला. मग फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा पत्ता कुणी कापला, अशी चर्चा पक्षात आहे.
































































