कारागृहातील बंदीवानांना अंघोळीसाठी मिळणार गरम पाणी, अपर महासंचालक अमिताभ गुप्ता यांचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील विविध कारागृहात बंदीवान असलेल्यांना आता अंघोळीसाठी गरम पाणी मिळणार आहे. त्याशिवाय नातलगांसोबत संवाद साधण्यासाठी टेलिफोनची संख्या वाढविण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे हिवाळ्यासह पावसाळ्यामध्ये थंड पाण्याने अंघोळ करणार्‍या बंदीवानांना कायमस्वरूपी गरम पाणी मिळणार आहे. कारागृह महानिरीक्षक व अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत.

विविध गुन्ह्यात बंदीवान असलेल्या कैद्यांच्या अडचणी जाणून घेउन त्यावर उपाययोजना राबविण्यावर प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबत राज्य कारागृह विभागाचेवतीने कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक व सर्व मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडली. त्यानुसार बंदीवानांना भौतिक गरजा पुर्ण मिळविण्याचा अधिकार आहे, त्यासाठी कारागृह प्रशासनाकडून कैद्यांना अंघोळीसाठी गरम पाणी, नातलगांसोबत बोलण्यासाठी जादा टेलिफोनची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यात कडाक्याची थंडी असल्याने कैद्यांना अंघोळीसाठी तातडीने गरम पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

वाढत्या थंडीमुळे कारागृहातील अनेक बंद्यांनी अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली. त्याप्रमाणे सर्व कारागृह अधीक्षकांनी बंद्यांना अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय कडाक्याची थंडी असल्यामुळे बंद्यांना झोपण्यासाठी सतरंजी, चादर, उशी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार बंदयांना झोपण्यासाठी आवश्यक साहित्य पुरविण्याच्या सूचना कारागृह प्रशासनाने दिल्या आहेत. राज्यातील विविध कारागृहातील बंद्यांकडून विविध वस्तू बनविण्यात येतात. आवश्यकता भासल्यास ज्या कारागृहात वस्तू तयार करण्यात येतात, त्याची मागणी नोंदवून वैâद्यांना वस्तू उपलब्ध करुन घेण्यात येणार आहेत.

मुलाखतीसाठी खिडक्या अन टेलिफोनही वाढणार

कारागृहातील बंद्यांच्या भेटीसाठी किंवा त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी होते. त्यासाठी सर्व बंद्यांच्या खिडकीद्वारे होणार्‍या मुलाखती वेळेत पूर्ण होण्यासाठी आणखी खिडक्या वाढविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नातलगांसोबत टेलिफोनद्वारे बोलण्यासाठी कॉईन बॉक्सची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्राधान्य देण्यात आले असून, लवकरच सोयी-सुविधा वाढविण्यात येणार आहेत.

राज्यातील विविध कारागृहात बंदीवानांना सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासा ठी प्राधान्य दिले आहे. विशेषतः अंघोळीसाठी गरम पाणी, कुटूंबियासोबत संवाद साधताना टेलिफोनची संख्या वाढविणे, झोपण्यासाठी चादर, उशी देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. बंदीवानांच्या मानवी गरजा पुरविण्यावर भर दिला असून, पुर्ततेसाठी प्रयत्न केले जात आहेत.
– अमिताभ गुप्ता, कारागृह महानिरीक्षक व अपर पोलीस महासंचालक