
सामना ऑनलाईन । मुंबई
पाकिस्तानात जाऊन तिथल्या लष्करप्रमुखांना मिठी मारणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धूवर देशभरातून टीकेची झोड उठली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही सिद्धूला खडे बोल सुनावले आहेत. ‘दहशतवाद्यांशी लढताना दररोज आपले जवान शहीद होत आहेत. ज्याच्या आदेशावर हे सर्व होत आहे त्या लष्करप्रमुखाला मिठी मारण्याआधी सिद्धूने विचार करायला हवा होता. त्याचे डोके फिरले आहे’, अशा शब्दांत अमरिंदर सिंग यांनी सिद्धूला फटकारले आहे.
निमंत्रण असूनही हिंदुस्थानातील अन्य खेळाडूंनी इम्रान खानच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला जाणे टाळले. पण सिद्धूने शपथविधीला हजेरी लावलीच. शिवाय लष्करप्रमुख बजावा यांनाही मिठी मारली. यावरून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर सिद्धू ट्रोल झाला असतानाच स्वपक्षीयांकडूनही त्याचा समाचार घेतला जात आहे.
सिद्धू म्हणतो, तुमची-आमची संस्कृती एकच म्हटले तर काय करू?
सिद्धू रविवारी वाघा बॉर्डरहून हिंदुस्थानात परतला त्यावेळी आपल्या वर्तणुकीचे स्पष्टीकरण देताना त्याने निर्लज्जपणाचा कळस केला. विचारलेल्या प्रश्नांवर प्रतिप्रश्न करीत तो म्हणाला, ‘जर एखादी व्यक्ती आपल्याजवळ येते आणि सांगते की तुमची आणि आमची संस्कृती एकच आहे तर आपण काय करणार!’ मसूद खानच्या शेजारी बसल्याबद्दल विचारले असता तो म्हणला, ‘आपल्याला जेव्हा कुठे निमंत्रण दिले जाते तेव्हा जिथे बसायला सांगितले जाते त्या ठिकाणीच बसावे लागते. मी सुरुवातीला वेगळ्या ठिकाणी बसलो होतो, मात्र नंतर मला त्यांच्या शेजारी बसण्यास सांगण्यात आले.’
ठोको गाली
भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योतसिंग सिद्धू अमरिंदर यांच्या मंत्रिमंडळात आहे. एक खेळाडू म्हणून इम्रान खानच्या शपथविधीला हजर राहण्यात काही हरकत नव्हती. सिद्धूला पाकव्याप्त कश्मीरचा कथित राष्ट्रपती मसूद खान याच्या शेजारी बसवण्यात आले. कदाचित त्यांना सिद्धू ओळखत नसेल. पण सिद्धू पाकिस्तानी लष्करप्रमुखाला ओळखत नाही असे म्हणत असेल तर ते कसे शक्य आहे! त्यांच्या गणवेशावर त्यांचे नाव लिहिलेले असते. तेव्हा जनरल बजावाविषयी प्रेम दाखवणे हे चुकीचेच आहे असे सांगत अमरिंदर यांनी सिद्धूला शालजोडीतली लगावली.
भाजपकडूनही जोरदार ताशेरे ओढण्यात आले. सिद्धूला मसूदच्या शेजारी बसण्यास सांगितले तेव्हा त्याने विरोध करायला हवा होता, पण त्याने तसे केले नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना जवान शहीद होतात. नागरिक या हल्ल्यात मारले जातात. पण याला जबाबदार असणाऱया लष्करप्रमुखाला मिठी मारताना तुम्हाला सर्वच गोष्टींचा विसर कसा पडू शकतो, असा सवाल भाजपचे प्रवक्ते संबित मित्रा यांनी सिद्धूला केला.
























































