
सामना ऑनलाईन । मुंबई
पालिका शाळांना पोषण आहार पुरवणाऱ्या महिला संस्था आणि बचत गटांना गेल्या एक-दीड वर्षापासून रखडलेले पैसे लवकरच मिळणार आहेत. या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी रखडलेले वेतन लवकरच देण्यासाठी तातडीने कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणारा पोषण आहार महिला संस्था आणि बचत गट अशा 260 संस्थांकडून पुरवण्यात येतो. मात्र यातील अनेक संस्थांचे बिल गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी नव्या निविदेसाठी पालिकेने घातलेल्या जाचक अटींमुळे महिला संस्था-बचतगट अडचणीत आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.






























































