
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटकेत असलेला बुकी अनिल जयसिंघानी व त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानी या दोघांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपणाला या गुह्यात नाहक गोवण्यात आले असून पोलिसांनी केलेली अटक बेकायदा आहे, असा आरोप दोन्ही आरोपींनी केला आहे. त्यांच्या वतीने अॅड. मानन शांघाई यांनी रिट यचिका दाखल केली आहे. याचिकेवर सोमवार, 27 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांनी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली. तो मागील सात वर्षांपासून फरार होता. त्याच्या इशाऱयावरून मुलगी अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करून 10 कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनिक्षालाही अटक केली आहे. सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. याचदरम्यान अनिल आणि निर्मल जयसिंघानी या दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
राजकीय हेतूने बोगस कारवाई!
ही राजकीय हेतूने करण्यात आलेली बोगस कारवाई आहे. ही कारवाई फौजदारी दंड संहितेच्या कलम 41 आणि कलम 41(अ) मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. पोलिसांनी कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केलेले नाही. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोठडीतून सुटका करण्याबाबत आदेश द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.