कुर्ल्यात बॅगेत सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा उलगडा, परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयातून हत्या

कुर्ला पश्चिमेकडील सीएसटी उड्डाणपुलाच्या खाली दोन बॅरिकेड्सच्या मध्ये बॅगेत एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. त्या प्रकरणाचा अखेर मुंबई गुन्हे शाखेने उलगडा केला. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने चारित्र्यावर संशय घेत त्याच्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावेळी मृतदेहाचे करायचे काय अशा द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या आरोपीने मृतदेह सुटकेसमध्ये भरून तो उड्डाणपुलाच्या खाली फेकला होता. ओडिशाला सटकण्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

गेल्या रविवारी कुर्ल्यातल्या सीएसटी उड्डाणपुलाखाली एका सुटकेसमध्ये भरलेला तरुणीचा मृतदेह सापडला होता. मुंबई गुन्हे शाखेची विविध पथके या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली. अखेर युनिट-5 चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक अजित गोंधळी, सपोनि अमोल माळी, उपनिरीक्षक विजय बेंडाळे, तसेच पथकाने मृत तरुणीच्या गळय़ात क्रॉसचे लॉकेट सापडल्याने त्या आधारे कुर्ला व आजूबाजूच्या परिसरातील सर्व चर्च तसेच ख्रिश्चन वस्ती असलेल्या भागात माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा अमोल माळी यांना ती मृत तरुणी प्रतिमा किसपट्टा (25) असून ती धारावीत राहत असल्याचे समजले. तपासात प्रतिमाची हत्या तिचा लिव्ह इनमधला पार्टनर अस्कर बरला (22) याने केल्याचे युनिट-11 ला समजले. पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेत ओडिशाला पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या अस्करला ठाणे स्थानकातून उचलले. चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली.