पूर्व-पश्चिममधील दुकानांत आनंदाचा शिधा दाखल, शिवसेनेच्या दणक्यानंतर रेशनिंग प्रशासन नरमले

राज्य सरकारने गणेशोत्सवानिमित्त गोरगरीबांना 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा केली. मात्र, सर्वसामान्यापर्यंत हा शिधा पोहोचलाच नाही. त्या पार्श्वभूमीवर, सोमवारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विलेपार्ले पश्चिम येथील झोनल रेशनिंग ऑफिसला आज घेराव घालत जाब विचारला. शिवसेनेच्या दणक्यानंतर रेशनिंग प्रशासन नरमले आणि विलेपार्ले पूर्व आणि पश्चिममधील काही शिधा दुकानांत संध्याकाळपर्यंत ‘आनंदाचा शिधा’ दाखल झाला.

गणेशोत्सवानिमित्त देण्यात येणाऱया आनंदाच्या शिध्यात 100 रुपयांत 1 किलो चणा डाळ, साखर, रवा आणि खाद्यतेल देण्यात येणार आहे. मात्र, हा आनंदाचा शिधा गणेशोत्सवाला एक दिवस शिल्लक असतानाही विलेपार्लेमधील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलाच नाही. याची दखल घेत शिवसेनेच्या वतीने आज विलेपार्ले पश्चिम येथील झोनल रेशनिंग ऑफिसला घेराव घालण्यात आला. शिवसेनेचा आक्रमक पवित्रा बघून अधिकाऱयांचे धाबे दणाणले आणि त्यांनी तात्काळ कार्यवाही करत धान्य 11 रेशनिंग दुकानांत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. संध्याकाळपर्यंत विलेपार्लेतील ज्या दुकानदारांनी किटसाठी पैसे भरले होते त्यापैकी काही दुकानांत धान्य पोहोचलेही. विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा घेराव घालण्यात आला होता. यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम, समन्वयक नितीन डिचोलकर, सुनील खाबिया, उपविभागप्रमुख चंद्रकांत पवार, प्रसाद आयरे, संजय पवार, वीणा टॉक, संजय जाधव, अनिल मालप आदी उपस्थित होते.