
हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका अर्थातच अॅण्डरसन -तेंडुलकर ट्रॉफी 2-2 अशी बरोबरीत सुटली असली तरी ही मालिका नव्या शतकातील सर्वात संस्मरणीय मालिका ठरलीय. या 25 दिवसांच्या कालावधीत दोन्ही संघांनी मिळून 1860.4 षटके टाकली, 6736 धावा ठोकल्या आणि एकूण 41 झेलही सोडले. क्रिकेटप्रेमींसाठी थराराची पर्वणी ठरलेल्या या मालिकेत धावांचा महापूर आणि विक्रमांची बरसात झाली.
ही मालिका कसोटी क्रिकेटमधील अनेक विक्रम आणि नव्या प्रवृत्तींचा साक्षीदार ठरली. मालिकेतील चार कसोटी सामने शेवटच्या दिवसापर्यंत रंगल्या आणि दोन कसोटींचा निकाल 25 पेक्षा कमी धावांनी लागला. अशा प्रकारची कामगिरी 21 व्या शतकात केवळ चौथ्यांदा घडली
या मालिकेचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे 21 शतके आणि 19 शतकी भागीदाऱया रचल्या गेलेल्या या मालिकेत 6736 धावा कुटल्या गेल्या, ज्या कसोटी क्रिकेटमधील दुसऱया क्रमांकाच्या सर्वोच्च धावसंख्येचे प्रमाण ठरले.
हिंदुस्थानी कर्णधार शुभमन गिलने 754 धावा करून मालिकेतील सर्वोच्च वैयक्तिक योगदान दिले. ही कामगिरी हिंदुस्थानी कर्णधाराकडून एका मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. मधल्या फळीत हिंदुस्थानने सरासरी 65.66 धावा केल्या, तर इंग्लंडची सरासरी 51.26 होती. रवींद्र जाडेजा हा मालिकेतील सर्वांत यशस्वी फलंदाज ठरला. त्याने सहा अर्धशतकांसह 516 धावा केल्या आणि केवळ एकदाच दुसऱया डावात बाद झाला.
गोलंदाजांची कसोटी
धावांचा महापूर गोलंदाजांसाठी खडतर परीक्षा ठरली. दोन्ही संघांनी मिळून 1860.4 षटके टाकली. इंग्लंडमध्ये 21 व्या शतकातील कोणत्याही मालिकेतील ही सर्वाधिक गोलंदाजी. इंग्लंडने एकटय़ाने 1052 षटके गोलंदाजी केली, जे 2017-18 च्या अशेस मालिकेनंतरचे सर्वाधिक प्रमाण ठरले.
कर्णधार बेन स्टोक्सने 140 षटके टाकून संघाचे नेतृत्व करताना उत्पृष्ट उदाहरण निर्माण केले. दुखापतीमुळे त्याला शेवटच्या कसोटीत खेळता आले नाही. या मालिकेत झेल सोडण्याचे प्रमाणही प्रचंड होते. तब्बल 41 वेळा फलंदाजांना झेल सुटल्यामुळे जीवदान लाभले.
ही मालिका निकालाच्या दृष्टीने जरी अनिर्णित राहिली असली तरी क्रिकेटप्रेमींसाठी ती संस्मरणीय ठरली. कसोटी क्रिकेट अजूनही जिवंत आहे, रंगतदार आहे आणि उत्पंठावर्धक आहे, हे या मालिकेने पुन्हा सिद्ध केले.






























































