प्रवाशांचा जीव महत्त्वाचा, त्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्या!

9

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील रेल्वे पुलांची दुरवस्था झाली असून प्रवाशांना चालताना जीव मुठीत ठेवून या पुलांवरून जावे लागते. मुंबईतील या धोकादायक पुलांवरून हायकोर्टाने आज रेल्वे प्रशासनासह पालिकेला फटकारले. रेल्वे व पालिका प्रशासन हे नागरिकांसाठी काम करीत असून मुंबईकरांची काळजी घेणे हा त्यांचा उद्देश आहे. प्रवाशांचा जीव महत्त्वाचा असून मुंबईकरांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पहा, असे स्पष्ट मत हायकोर्टाने आज व्यक्त केले. तसेच या समस्या मार्गी लावण्यासाठी दररोज एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आदेश हायकोर्टाने आज पालिका व रेल्वे प्रशासनाला दिले.

मुंबईतील अंधेरी येथे रेल्वेचा पूल कोसळून २ जण दगावल्याची घटना जुलैमध्ये घडली तर गेल्या वर्षी प्रभादेवी येथे चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेतही २३ जणांचा बळी गेला. या पुलांच्या दुरवस्थेवरून स्वाती त्रिवेदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. रेल्वे प्रशासनाचे या पुलांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला खडेबोल सुनावले.

 पालिका २७ कोटी देणार

पुलांची निगा राखण्यासाठी पालिका प्रशासनाकडे रेल्वेने २७ कोटींची मागणी केली असून मुंबई महापालिका हे पैसे देण्यास तयारही आहे परंतु अद्यापही रेल्वे प्रशासनाने कामाचा प्रस्ताव आणि त्याची माहिती दिली नसल्याचे पालिका प्रशासनाने खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी संबधित माहिती पालिकेला देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले.

 

आपली प्रतिक्रिया द्या